राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची टीका

राज्यकर्त्यांच्या नाकत्रेपणामुळे शेतकरी रस्त्यावर आला. आंदोलन हाताबाहेर जाऊ नये, म्हणून घाईगडबडीत कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला. अल्पभूधारकांना कर्ज माफ झाल्याचे ते सांगत आहेत. आता त्यांना पेरणीसाठी कर्जपुरवठा तत्काळ व्हावा, कर्जमाफीसाठी निकष न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये मंगळवारी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकारांच्या बठकीत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची उपस्थिती होती.

तटकरे म्हणाले, केवळ पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरात ३५ जिल्हे व महानगरात दौरा होणार आहे. हा दौरा १८ जूनपर्यंत मराठवाडय़ात, नंतर राज्यभरातील इतर जिल्ह्यात करणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाकडून संघर्ष केला जाईल, तसेच मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरली जाईल, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पक्ष यापुढे काम करणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही गेल्या अडीच वषार्ंपासून संघर्ष करीत आहोत. त्यासाठी जेलभरो आंदोलन केले. सर्व विरोधी पक्षांनी संघर्षयात्रा काढली. शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर हे आंदोलन हाताबाहेर जाऊ नये, हे पाहून सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असल्याचे ते म्हणाले.

राजकीय पर्यावरण खराब करू नये

राष्ट्रवादीचे नेते आपले पाप झाकण्यासाठी सत्तेत सहभागी होण्यास उतावीळ झाले असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या आरोपावर विचारले असता तटकरे म्हणाले, कदम यांची उध्दवचरणी निष्ठा असल्याने हे वायफळ बडबड करतात. खिशात राजीनामे असल्याचे सांगणाऱ्यांची दुटप्पी भूमिका आता लोकांसमोर उघड झाल्याचे सांगून त्यांनी राज्यातील राजकीय पक्षाचे पर्यावरण खराब करू नये, असे उत्तर दिले. राज्याच्या इतिहासात आत्तापर्यंत आलेल्या सरकारचे संख्याबळ १६० ते १६५पर्यंत होते. ती सर्व सरकारे मजबूत होती. परंतु १९५ संख्याबळ असलेले हे राज्यातील सरकार अत्यंत दुबळे असल्याचे ते म्हणाले.