सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : प्राणवायूच्या तुटवडय़ामुळे खासगी रुग्णालयांना होणारा प्राणवायूचा प्रति घनमीटर २२ रुपये ६० पैसे दर पुरवठादारांनी आता ३२ रुपये ६३ पैशांपर्यंत वाढविला आहे. तर द्रवरुप प्राणवायूचा दर ३५ रुपये ८४ पैशांवर गेला आहे. विशेषत: प्राणवायूचे सिलिंडर भरून नेणाऱ्यांना ही रक्कम दुपटीपेक्षा अधिक आहे. खासगी रुग्णालयांचा प्राणवायूचा खर्चही दुप्पट होत आहे.

मार्चमध्ये एक सिलिंडर १४० रुपयांना मिळायचे तेच आता वस्तू सेवा कर समाविष्ट करून ४२५ रुपयांपर्यंत जात आहे. या अनुषंगाने अन्न व औषध विभागचे सहसंचालक संजय काळे यांना विचारले असता, ‘दर नव्हे तर वाहतूक खर्च वाढला आहे,’ असे ते म्हणाले. मात्र, खासगी रुग्णालयांचा प्राणवायूचा खर्च आता दुप्पट होत आहे.

ज्या जिल्ह्य़ात द्रवरुप प्राणवायू निर्मिती केंद्राची क्षमता कमी आहे तेथे पुरवठारांनी वाट्टेल ती किंमत आकारण्यास सुरुवात केली आहे. लातूर येथील डॉ. प्रमोद घुगे म्हणाले, पूर्वी एक सिलिंडर १४० रुपयांना मिळायचा आता ३८० रुपयांपर्यंत गेला आहे. प्राणवायूला १२ टक्के वस्तू व सेवा कर आकारला जातो. केंद्र आणि राज्याचे प्रत्येकी सहा टक्के. त्यामुळे एक सिलिंडर आता ४२५ रुपयांपर्यत जात आहे. या शिवाय प्राणवायू मिळविण्यासाठीचा मनस्ताप अजूनही कमी झालेला नाही. शासकीय रुग्णालयांना प्राणवायू पुरविणाऱ्या कंत्राटदाराबरोबर वर्षेभराचे करार केले जातात. अद्याप जुना करार सुरू आहे. नव्याने निविदा काढाव्या लागणार आहेत. पण सध्या औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयासाठी पुरविण्यात येणारा प्राणवायूचा दर कायम आहे. विविध राज्यांतून आणि अधिक अंतरावरून प्राणवायू आणला जात असल्याने त्याचे दर वाढविले असल्याचे समर्थन केले जात आहे.  दरम्यान लातूर, बीड जिल्ह्य़ातील करोना रुग्णसंख्या वाढत असून प्राणवायूची मागणीही कायम आहे.

कृत्रिम वायूचाही तुटवडा

औद्योगिक वापरासाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन पूर्णत: रुग्णालयासाठी वापरता येत आहे. शिवाय कार्बनडाय ऑक्साईड, द्रवरुप नायट्रोजन, आरगॉन या वायूचाही तुटवडा आहे. कार्बन डायऑक्साईड हे अग्निशमन यंत्रांमध्ये अधिक प्रमाणात वापरले जाते. तसेच या तुटवडय़ामुळे औद्योगिक क्षेत्रात धातू झाळण्याची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. ऑक्सिजन नसल्याचा फटका विशेषत: शीतकरण प्रक्रियेतील उद्योगांना अधिक बसला आहे. फ्रिज, वातानुकूलित यंत्रणेत तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमचा जोड द्यावा लागतो. त्यासाठी प्राणवायू आवश्यक असतो. तो सध्या उपलब्ध नसल्याने फ्रिज उत्पादन जवळपास थांबले असल्याचे उद्योजक अशोक काळे यांनी सांगितले.