News Flash

रमेडेसिविरचा पुरवठा मागणीच्या ४० टक्के

प्राणवायूही जेमतेम;  नांदेड, बीड, लातूर जिल्ह्याची मागणी वाढली

प्राणवायूही जेमतेम;  नांदेड, बीड, लातूर जिल्ह्याची मागणी वाढली

औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या काहीशी स्थिरावली असल्याचे चित्र शहरी भागात दिसत असले तरी रुग्णालयास आवश्यक असणारा प्राणवायूच्या मागणीत अजूनही  म्हणावी अशी घट दिसून येत नाही. बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील मागणीत किंचिंतशी वाढ झाली आहे. मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत मिळणारा प्राणवायू १८४ मेट्रीक टनाचा आहे तर झालेला वापर १९० मेट्रीक टनाचा आहे.  पण स्थिरावलेल्या रुग्णसंख्येमुळे आणि होणाऱ्या पुरवठय़ामुळे श्वास अडणार नाही, असे चित्र दिसून येत आहे. दरम्यान रेमडेसिविरची टंचाई आणखी किती दिवस सुरू राहील  या विषयी मात्र सर्व स्तरात अनिश्चितता दिसून येते. मागणीच्या प्रमाणात केवळ ४० टक्के पुरवठा होत असल्याचे सांगण्यात  येत आहे. औरंगाबाद शहरातील प्राणवायूचा वापर गेल्या आठवडय़ात ६७ टनापर्यंत होता आता तो ६० टनापर्यंत खाली आला आहे.

मराठवाडय़ातील नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्याला मिळणारा प्राणवायू आणि होणारा पुरवठा यात अजूनही तूट आहे. ही तूट फारशी नसली नसली तरी वाहतुकीमध्ये एखादी जरी समस्या निर्माण झाली तर पुन्हा तुटवडय़ाची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्राणवायू प्रकल्पही सुरू झाल्यानेही काहीसा दिलासा मिळाल्याचे अधिकारी सांगतात. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्राणवायूचा वापर कसा करावा, त्यात काटकसर कशी करावी याचे मार्गदर्शनही केले. तसेच काही खासगी रुग्णालयातील प्राणवायू वापराचे लेखापरीक्षणही केल्याने वापरात काहीशी घट होत असल्याचा दावा प्रशासकीय पातळीवरुन केला जात आहे. गेल्या महिनाभरातील प्राणवायू पुरवठय़ाची स्थिती आता काहीशी सुधारली असली तरी मराठवाडय़ातील चार जिल्ह्यांच्या पुरवठय़ावर अजूनही बारकाईने लक्ष ठेवावे लागत आहे. नांदेड, लातूर, बीड या तीन जिल्ह्यांत कोविड रुग्णसंख्याही फारशी कमी होताना दिसत नाही. सोमवारच्या दिवसात प्राणवायू मागणीमध्ये २९ टनापर्यंत घट आहे. त्याचा पुरवठा होत आहे. पण सध्या रेमडेसिविरची मागणी आणि पुरवठा यामध्ये सारे प्रशासन हैराण आहे.

ग्रामीण भागातील संसर्ग वाढताच

मराठवाडय़ातील ग्रामीण भागातील संसर्ग वाढताच असून रविवारी सकाळी सरकारकडे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार  मराठवाडय़ातील आठही जिल्ह्यांत  ग्रामीण भागात तर  ५ हजार ६५५ रुग्ण तर शहरी भागात केवळ १ हजार ५२४ रुग्ण आढळून आले. दरम्यान कडक टाळेबंदीमुळे तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमुळे रुग्णवाढीला काहीशी स्थिरता आल्याचा दावा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी औरंगाबाद येथे केला. आतापर्यंत मराठवाडय़ात ९ हजार २८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून शनिवारच्या दिवसात १३५ जणांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता वाढत असून मराठवाडय़ात ते ८२.८६ सर्वाधिक बरे होण्याचे प्रमाण औरंगाबाद जिल्ह्यात ८८.६७ एवढे आहे.

कुंभमेळयातील भाविकांनी विलगीकरणात रहावे

कुंभमेळयासाठी हरिव्दारहून परतलेल्या नागरिकांनी घरात स्वतंत्रपणे विलगीकरणात रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने अशा व्यक्तींचा शोधही घेतला जात असून गावातील दक्षता समित्या यावर काम करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:44 am

Web Title: supply of remdesivir is 40 percent of the demand zws 70
Next Stories
1 औरंगाबादेतून ३८ प्राणवायू टँकरची वाहतूक
2 मागणी एक मात्र पुरवठा भलताच!
3 वाहतूक व्यवसाय पुन्हा घसरणीला
Just Now!
X