सरकार स्थिर असावे, अशी भावना अनेकांमध्ये अनेकदा निर्माण होते. या पुढच्या काळात ती भावना कोणाच्या मनात निर्माण होते, हे पाहावे लागेल, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांना टोला लगावला. मात्र, युतीत फाटाफूट झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पािठबा देणार नाही, या पवारांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले. पठण येथे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप- शिवसेनेतील खेचाखेचीवर चव्हाण म्हणाले की, सरकार कसे स्थिर ठेवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेने ज्या पद्धतीने शाईफेक केली त्याचे कधीच समर्थन करता येणार नाही. ही आपली संस्कृती नाही, असे सांगत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. सरकार स्थिर ठेवायचे की नाही, हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. मात्र, आता वैचारिक मतभेदाच्या पुढे जात युतीमध्ये संघर्ष दिसत असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. शेतकऱ्यांना मानसोपचार केंद्रात पाठविण्यासाठी शासन निर्णय काढण्याचा निर्णय चमत्कारिक असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या दु:खावर सरकार मीठ चोळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हक्काचं मिळत नसल्याची खंत
मराठवाडय़ाला आजही हक्काचे पाणी मिळत नाही. त्यावेळी नगर व नाशिक जिल्ह्यांत म्हणजे जायकवाडीच्या वरच्या भागात होणाऱ्या धरणाला काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा विरोध होता. त्या वेळी त्यांचे मत विचारात घेतले असते तर ही वेळ आली नसती. सरकार कोणाचेही असो, मराठवाडय़ाला हक्काचे पाणी मिळायलाच हवे. ते मिळत नसल्याची खंत असल्याचे अशोकराव म्हणाले. केवळ जायकवाडीच नाही, तर अन्य भागातही समन्यायी पाणीवाटपाची आवश्यकता आहे. त्या साठी सरकारने योग्य पावले उचलली नाही तर पाणी पेटेल, असेही ते म्हणाले.