साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांचा ग्रंथ व्यवहार खरा असल्याचे सांगण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मुलाच्या व्यसनाधिनतेचा खर्च विश्वकोशाच्या निधीतून झाला होता. मात्र, त्याची बातमी तळवळकर, टिकेकर आणि अनंत भालेराव यांनी कधी छापली का, असा सवाल विचारत भांड यांचे समर्थन केले.
साकेत वर्ल्ड बुक आणि बाबा भांड यांच्या ‘स्वातंत्र्ययुद्धाचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड’ या पुस्तकाचे येथे शुक्रवारी प्रकाशन झाले. त्याप्रसंगी नेमाडे बोलत होते. व्यासपीठावर संजय भास्कर जोशी यांची उपस्थिती होती. मराठी संस्कृती संकुचित झाल्याचे सांगत इतिहासाकडे दुर्लक्ष का होते याचे विवेचन करताना नेमाडे म्हणाले की, नको इतके वर्तमानपत्रावर आणि बातम्यांवरील प्रेम त्यास कारणीभूत आहे. बातम्या ऐकत बसणे हा एक प्रकारचा मनोविकार आहे. अध्र्या तासात १०० किंवा ४० गावांच्या बातम्या यातून काय मिळणार, असा सवाल करीत त्यांनी टीआरपीवर शेरेबाजी केली.
तत्पूर्वी इतिहास लिखाणात सयाजीराव गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष कसे झाले हे सांगण्यासाठी मराठीपणाची संस्कृती कशी संकुचित झाली आहे, हे नेमाडे यांनी सांगितले. तमिळनाडूमध्ये मराठी संस्कृती जपणारे आहेत. उडियाचे व्याकरण मराठी माणसाने लिहिले आहे. ते तिकडे ओडिसामध्ये मराठीपणाची महती सांगतात. मस्तानीच्या वंशजांना यवन ठरवून त्यांचे मराठीपण नाकारले. गुजरातमध्येही खूप मराठी माणसांनी चांगले काम केले. आपल्याकडे इतिहास लिहिणारे ‘मुख्यमंत्री कोण ते कसे हरले असलाच इतिहास मांडतात. बातम्यांच्या सर्कशीत पडद्याआडचे, पायाखालचे, व्यामिश्र असे काही बाहेर येत नाही,’ असे ते म्हणाले.
बाबा भांड यांच्या ग्रंथ गरव्यवहाराच्या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करीत नेमाडे यांनी थेट गोिवद तळवलकर, अरुण टिकेकर आणि अनंत भालेराव यांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न केला. एका बहुखपाच्या दैनिकात भांड यांची बातमी आल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया विचारल्या. हे खरे आहे काय, असे विचारल्यावर त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मुलाविषयी सांगितले. जोशी यांच्या मुलाला गांजा-चरसचे व्यसन होते. त्याच्यावर अमेरिकेत इलाज करण्यात आला. तेव्हा त्याचा खर्च विश्वकोश निधीतून झाला होता. या बाबत हातकणंगलेकरांना विचारले होते, तेव्हा त्यांनी तो लिथोग्राफी म्हणजे नकाशासंबधीचा अभ्यास करण्यास गेल्याचे सांगितले होते. मात्र, या बाबतची बातमी कधी थोर स्वातंत्र्यतावादी तळवलकर, टिकेकर व अनंत भालेराव यांनी छापली नाही.
इतिहासात सयाजीराव गायकवाड यांचे काम मोठे होते. अनेक पुस्तकांचा अनुवाद त्यांनी करवून घेतला. चिं. वि. जोशींकडून जातक कथा मराठीत आणल्या. १५० हून अधिक पुस्तके त्यांच्यामुळे मराठी माणसाला मिळाली. त्यांचे अनेक राजकीय निर्णय दीर्घकाळ सुधारणा करणारे होते, असेही त्यांनी या वेळी सांगितले. अनेक विषयांवर शेरेबाजी करीत इतिहासाचे नीट व नव्याने लिखाण करण्याची आवश्यकता असल्याचेही नेमाडे यांनी या वेळी सांगितले.