खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजप नेत्यांना टोला

ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘वयोश्री’ ही योजना देशात केवळ बारामतीतच राबवण्यात आली आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, त्या अधिक सजगतेने राबवण्यात बारामती वाराणसीपेक्षा पुढे आहे, असा टोला भाजप नेत्यांना लगावला. भाजपचा अलिकडेच पुण्यामध्ये मेळावा झाला. यामध्ये बारामतीचीही जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाय वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्याला अनुसरून सुळे यांचे हे विधान असल्याचे मानले जाते.

महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) या शिक्षक संघटनेच्या अधिवेशनाच्या उद्घाटनानिमित्त सुप्रिया सुळे  येथे आल्या होत्या. सुळे यांनी राज्यातील शिक्षण खात्यावर आणि मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बठक सोडून यवतमाळाला प्रचार सभेला गेले.देशावरील अशा संकटकाळात तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असलेल्या मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरिन्सगवरूनही संवाद साधता आला असता, अशी टीकाही सुळे यांनी केली. या वेळी मंचावर पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, मुप्टाचे सुनील मगरे, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके आदी उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबात भांडणे लावण्याचा प्रकार

खासदार सुळे यांनी शेतकरी सन्मान योजनेवरूनही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देणे म्हणजे त्यांच्या कुटुंबात भांडणे लावण्याचा प्रकार आहे. एका घरातील अनेक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याशिवाय हे दोन हजार रुपये मिळणार नाहीत. तशा अटीच नमूद केलेल्या आहेत. एखादा भाऊ दूरच्या गावात असेल तर येण्या-जाण्यालाच तेवढे पसे लागतील. तेव्हा ते दोन हजार काय परवडणार आहेत, किती रुपये प्रत्येकाला मिळतील, असा प्रश्न उपस्थित केला.