स्मारकांचा निधी व शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध

राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा मुद्दा आणि वेगवेगळ्या स्मारकांना न दिलेला निधी याचा निषेध नोंदविण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी लाल महालासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करणार असल्याची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यांचे हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नसून वैयक्तिक असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. मराठी मुलगी म्हणून राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे सांगत वेगवेगळ्या प्रकारच्या स्मारकांच्या केलेल्या घोषणा आणि त्यासाठी न दिलेला निधी याच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंदखेडराजा येथे विकासासाठी साडेतीनशे कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा करण्यासाठी सत्ताधारी हेलिकॉप्टरने आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कोटय़वधी रुपयांचे स्मारक देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. वेगवेगळ्या राज्यातून नद्यांचे पाणी त्यांनी आणले होते. बोटीतून पंतप्रधानांना आपण उद्घाटन करताना पाहिले. त्या कार्यक्रमावर पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तेवढय़ा रकमेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे घेतले असते तर अधिक लोकांनी त्यांचे दर्शन घेतले असते. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमावर पाच कोटी रुपये खर्च झाले. विविध स्मारकांसाठी निधी न देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच मराठी मुलगी म्हणून शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

माननीय मुख्यमंत्री!

विविध मागण्यांबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, असा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी भाषणात केला आणि श्रोत्यांपैकी एका कार्यकर्त्यांने त्यांना माननीय म्हणू नका, असे म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी हसू आले. मात्र, पुढच्या भाषणातही त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख माननीय असाच केला, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी माननीय म्हणत नाही, असे त्या एकदा म्हणाल्या आणि नंतर सवयीने माननीय मुख्यमंत्री असे त्या म्हणायच्या आणि नंतर जोडूनच ‘सॉरी’ही म्हणायच्या. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांनाही ‘चले जाव’ म्हणा, असे आवाहन करत त्यांनी भाषण संपविले.