|| सुहास सरदेशमुख

सुरेश धस यांच्या विजयानंतर भाजपकडून इतर मागासवर्गीयांबरोबरच मराठा समाजाच्या मतांवर लक्ष केंद्रीत

बीड जिल्ह्य़ात वसंतराव भागवतांनी ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) चे सूत्र मांडले. महाजन-मुंडेंनी हे सूत्र राजकीयदृष्टय़ा यशस्वी असल्याचे दाखवून दिले. आता विधान परिषदेच्या भाजपच्या विजयामुळे या सूत्रात मराठा नेतृत्वाची भर पडली आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड ही विधान परिषदेची निवडणूक लढवताना सुरेश धस यांनी ‘आपण मराठा समाजाचे नेते आहोत’ असा उल्लेख आवर्जून केला होता. त्यांच्या विजयामुळे आष्टी, पाटोदा, शिरूर या मतदारसंघातील राजकीय गणितांची फेरमांडणी अधिक सूत्रबद्ध होईल, असे मानले जात आहे.  एकेकाळी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या धस यांना जिल्ह्य़ाच्या राजकारणाचा चांगला आवाका आहे आणि तेच आता भाजपमध्ये दाखल झाल्याने लोकसभेच्या यशाचे सूत्र ठरल्यात जमा असल्याची चर्चा बीड जिल्ह्य़ाच्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

बीड जिल्ह्य़ाच्या राजकारणाचा पोत ठरवताना नेहमीच जातीय अंगाने विचार केला जातो. आष्टी मतदारसंघाचे नेतृत्व सध्या भीमराव धोंडे करत आहेत. त्यांना एक लाख २० हजार ९१५ एवढी मते मिळाली. तर सुरेश धस यांना एक लाख १४ हजार ९३३ मते मिळाली होती. आता ते दोघेही एकाच पक्षात आहेत. धस विधान परिषदेचे आमदार झाल्यामुळे धोंडे यांच्या राजकारणाचा मार्गही मोकळा झाल्याचे मानले जाते. धोंडे ‘माधव’ प्रवर्गातील एक नेते. ओबीसीच्या राजकीय गणितांना एका अर्थाने बळकटीच. त्यात धस यांची आता भर पडली आहे. ते स्वत:च आपण मराठा समाजाचे नेते आहोत, असे सांगत असल्याने त्यांच्या पाठीमागे समाज पाठबळ उभे राहील, असे सांगणाऱ्यांची संख्या कमी नाही.

स्थानिक मतांची गणिते

आष्टी-पाटोदा मतदारसंघातच शिरूर तालुकाही येतो. या तालुक्यातील तिंतरवनी आणि मातोरी हे दोन जिल्हा परिषदेच्या गटांमध्येही धस यांचा अधिक प्रभाव असल्याचा दावा कार्यकर्ते करत असतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये या चार तालुक्यांतील मतदार पुन्हा एकदा भाजपच्या पाठीमागे उभा राहील, असा दावा केला जातो. या सगळ्या लोकसभेच्या गणितात परळीचे गणित मात्र तुलनेने वेगळे आहे. परळीत थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्येच लढत असते. निवडणुका विधानसभेच्या असो की ग्रामपंचायतीच्या. त्यामुळे या मतदारसंघावर धस यांच्या विजयाचा फारसा परिणाम होणार नाही, असे विजय मिळविल्यापासून सांगायला सुरुवात झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेक आश्चर्यकारक बदलही दिसून आले. गेवराई मतदारसंघातून बदामराव पंडितांना पराभूत करून लक्ष्मण पवार यांनी विजय मिळविला होता. आता ते गणित तसेच राहील का, याविषयी शंका घेतल्या जातात. पण लोकसभा मतदारसंघासाठी पूरक आणि पोषक वातावरण निर्माण करणारा विजय असे भाजपचे कार्यकर्ते आवर्जून सांगत आहेत. ही सगळी राजकीय गणिते जुळवून आणण्यात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पण ही सगळी गणिते लोकसभेसाठी अधिक उपयोगी पडतील, असा दावा केला जात आहे. बीड जिल्ह्य़ात बीड मतदारसंघ वगळता अन्य पाच मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यातील काही लाटेतील नशीबवान. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी   ६१३२ मतांनी विजय मिळवला होता खरा, पण विजयानंतर क्षीरसागर कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर ते नाराज आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत बाद झालेल्या २५ मतांचे श्रेय उस्मानाबाद जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते क्षीरसागरांच्या पारडय़ात टाकत आहेत. ही श्रेयाची देवाणघेवाण किती खरी, किती खोटी हे हळुहळु स्पष्ट होईल. या निमित्ताने राष्ट्रवादीतील नाराजी भाजपच्या पथ्यावर पडली, असे म्हणता येऊ शकेल. या विजयामुळे आमदार विनायक मेटे यांनाही जिल्ह्य़ात एक समर्थ पर्याय निर्माण झाला आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील सुंदोपसुंदीचे वृत्त अधूनमधून येत असतेच. मेटेंना आता धस यांचाही सामना करावा लागेल. त्यामुळे दैनंदिन राजकीय घडामोडींमध्ये धस यांचे महत्त्व वाढेल. परिणामी बीड लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित होईल, असे सांगण्यात येते. या सगळ्या पाठीमागे ‘माधव’ सूत्रात ‘म’ची भर पडली आहे.