सुरेश धस यांचा आरोप

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविषयीची नाराजी नाही. मात्र, स्थानिक नेते केवळ समर्थकांना मोठे करण्यासाठी धडपडताहेत. ज्या गटातून पत्नी निवडणुकीत उभी होती, तेथे राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील नेत्यांनी विरोधी उमेदवारांना पैसे पुरवले. आता कारवाईची भाषा केली जात आहे. मी कारवाईस तयार आहे,’ अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केली. बीड जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत यावी म्हणून धस यांच्या समर्थकांनी मतदान केल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ‘अद्याप मी राष्ट्रवादीत आहे. आता त्यांनी कारवाई करायची ठरवली आहे. पण तत्पूर्वी म्हणणे ऐकून घ्या,’ अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना करणार असल्याचे धस यांनी सांगितले.

जयदत्त क्षीरसागर वगळता बीड जिल्ह्य़ातील बहुतांश नेत्यांना मी राष्ट्रवादीत आणले आहे. आता तेच माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे गट निवडून येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणार असतील तर मी शांत बसावे काय,’ असेही धस म्हणाले. ज्या गटातून धस यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात होती, तेथे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधकांना पैसे पुरवले, असा आरोपही त्यांनी केला.

धस यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली होती. प्रकाश सोळंके यांनी अक्षय मुंदडा, जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

जिल्हा परिषदेत भाजपला मतदान करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी पक्षातील नेत्यांना सांगितला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विश्वासघात केल्याचा आरोपही खोटा असल्याचे धस म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. पक्ष वाढविण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. तटकरे यांचा मुलगा आमदार आहे. आता मुलगी जिल्हा परिषदेत अध्यक्ष झाली. पुतण्यालाही राजकारणात त्यांनी स्थिर केले आहे. प्रस्थापित नेत्यांनी सामान्य माणसाला उमेदवारी द्यायचीच नाही काय, असा सवालही त्यांनी केला.