मुंबईच्या जोगेश्वरी भागामधून आलेल्या करोनाबाधित गरोदर महिलेची शनिवारी शस्त्रक्रिया करुन  प्रसूती करण्यात आली. संबंधित महिलेला मुलगी झाली असून तिच्याही लाळेचा नमूना घेण्यात आला असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.

ही महिला शस्त्रक्रियेने प्रसूती करुन घेण्यास शुक्रवारी सायंकाळपर्यंत तयार नव्हती. अखेर गर्भाशयातील पाणी कमी होत असल्याने बाळाच्या जिवाला धोका असल्याचे सांगितल्यानंतर ती तयार झाली. ‘पीपीई’सह सर्व काळजी घेत करोनाबाधित महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. करोनाबाधित गरोदर महिलेची देशातील दुसरी, तर राज्यातील पहिलीच  प्रसूती असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

औरंगाबाद येथे एका रुग्णवाहिकेने आलेल्या या गरोदर महिलेच्या मुलास करोनाची लागण झाली होती. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या या महिलेचाही अहवाल सकारात्मक आल्याने संबंधित महिलेच्या प्रसूतीबाबत गुंतागुत झाली होती. अखेर ही प्रसूती कोविड रुग्णालयातच करण्याचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी घेतला.  या महिलेची प्रसूती नैसर्गिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात काही अडचणी येत होत्या. दुसरीकडे दिवस उलटून गेल्याने तसेच गर्भाशयातील पाणी कमी होत असल्याने ही प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यास संबंधित महिला तयार होत नव्हती. अखेर तिचे प्रसूतिपूर्व समुपदेशन केले आणि आज शस्त्रक्रियेद्वारे तिची प्रसूती करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण काळजी घेऊन पार पाडण्यात आली. यामध्ये डॉ. कविता जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ डॉ. भारती नागरे, आशा मेरी थॉमस, सुरेखा ढेपले, ज्योती दारुंडे या परिचारिका आदींनीही भाग घेतला.