पाणीप्रश्न गंभीर बनला असून यावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पध्रेअंतर्गत निवडलेल्या गावांतील जनतेने स्वतहून पुढाकार घ्यावा. चांगले काम करणाऱ्या गावात आपण स्वत: श्रमदान करू, इतर चित्रपट कलावंतांनाही जलसंधारण कामात सहभागी करून घेऊ, अशी ग्वाही देताना जलसंधारण कामाची लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा अभिनेता आमीर खान यांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन तालुक्यांची निवड केली असून, स्पध्रेच्या माध्यमातून सर्व गावांपर्यंत जलसंधारणाचे काम घेऊन जाणार असल्याचेही त्याने सांगितले.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी सामाजिक संस्थांबरोबरच आता अभिनेत्यांनीही पुढाकार घेतला आहे. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. आता अभिनेता आमीर खान याने स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशनअंतर्गत राज्यातील तीन तालुके सत्यमेव जयते वॉटर कप स्पध्रेसाठी निवडण्यात आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील वरुड व सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या तालुक्यांचा समोवश आहे.
स्पध्रेत सहभागी गावांच्या कामाचा आढावा घेण्यास शुक्रवारी दाखल झालेल्या आमीर खान याने अंबाजोगाईचा दौरा केला. प्रशासकीय पातळीवर या दौऱ्याबाबत अत्यंत गुप्तता पाळली गेली. दुपारी साडेबाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने आमीर खानचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरातील हेलिपॅडवर आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी आणि पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ हे त्याच्यासोबत होते. रुग्णालय सभागृहात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, आमदार संगीता ठोंबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी या निवडक प्रमुखांसह गावचे ग्रामसेवक, तलाठी आणि नागरिक यांच्याशी आमीरने संवाद साधला.
नवलकिशोर राम यांनी कामांची माहिती दिल्यानंतर आमीरने पाणीप्रश्न गंभीर असून त्यावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून पुढाकार घेणे आवश्यक आहे. पाणी बचत आणि संवर्धन ही लोकचळवळ झाली पाहिजे. सत्यमेव जयतेमार्फत वॉटर कपसाठी या वर्षी निवड केलेल्या गावांनी चांगला सहभाग द्यावा. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या गावाला ५० लाख, दुसऱ्या क्रमांकाच्या गावाला ३० लाख, तर  तिसऱ्या क्रमांकाच्या गावाला २० लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. आपण स्वत: गावात येऊन श्रमदान करणार आहोत. इतर कलावंतांनाही श्रमदानासाठी सहभागी करून घेणार असल्याचे आमीरने सांगितले.
दौऱ्याची गुप्तता, चाहत्यांची गर्दी आणि पोलिसांचा दंडुका
आमीर खानच्या दौऱ्याबाबत प्रशासकीय यंत्रणेने कमालीची गुप्तता पाळली. तरीही सकाळी अंबाजोगाईत हेलीपॅडपासून रुग्णालयापर्यंत आमीरला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. माध्यमांचे प्रतिनिधीही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मात्र, प्रशासकीय अधिकारी वगळता बैठकीत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. आमीरला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमाराचा दंडुकाही वापरला. गुलाबी टी शर्ट आणि काळी पँट परिधान केलेल्या आमीरचे हेलिकॉप्टरमधून आगमन होताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी धाव घेतली. आमीरनेही चाहत्यांना हात उंचावत प्रतिसाद दिला.