पंधरा दिवसांत सहा संशयित

औरंगाबाद : शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच डेंग्यूने शिरकाव केला असून पंधरा दिवसात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डेंग्यूचे संशयित ३० रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दीड वर्षांपासून करोना संसर्गाने थैमान घातले आहे. सध्या करोना अटोक्यात आला असून रुग्णसंख्या देखील बोटावर मोजण्या इतकी आढळून येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ही तयारी सुरू असतानाच शहरात डेंग्यूने शिरकाव केल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. पावसाळयात डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे हिवताप, मलेरिया, डेंग्यूसारखे साथीचे आजार डोके वर काढत आहेत.  परंतु पंधरा दिवसात डेग्यू संशयित सहा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. मनपाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जानेवारी ते १५ जुलै दरम्यान ३० डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले.  शहरात एक वर्षांआड  डेंग्यूचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे.

तीन वर्षांतील डेंग्यूचे रुग्ण

वर्ष         संशयित/डेंग्यू झालेले रुग्ण

२०१८         १९०/७२

२०१९         १०६९/२४७

२०२०         ६४/१०

२०२१ –     ३०/००   (आतापर्यंत)