स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नावर लढणारी असली तरी शहरातील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा व भ्रष्टाचारमुक्त शासन चालवण्याच्या मुद्यावर येत्या महानगरपालिका निवडणुकीत पक्ष उतरणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी येथे दिली.

संघटनेची पुनर्बाधणी करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, प्रामाणिक माणसांनी राजकारणात यायला हवे. पक्षाकडे अनेक प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे चेहरे आहेत. या चेहऱ्यांच्या बळावर स्वाभिमानी शेतकरी संघटना महानगरपालिका निवडणुकीत उतरणार आहे. येत्या २० तारखेपर्यंत संघटनात्मक पुनर्बाधणीसाठी २० फेब्रुवारीपर्यंत दौरा आयोजित केलेला असून २२ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे राज्यपातळीवरील बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रदेश, विभागीय व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

महाआघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेट्टी म्हणाले, राज्य सरकारची ही बिनकामाची कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचेही दुर्लक्ष होत आहे.