इशारा देणारा कार्यकर्ता, प्रश्नांच्या सरबत्तीवर मूक

विधानसभा निवडणुकीपूर्वी सोयाबीन परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ, अशी ओळख असणारे सदाभाऊ खोत म्हणाले होते, ‘सोयाबीनला पाच हजार रुपये भाव दिला नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नाही’. सोयाबीनचा आजचा भाव १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरला. तेव्हा अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सदाभाऊंना आता किती भाव असावा, असा प्रश्न विचारला. ‘आता तुम्ही मंत्री आहात, त्यावर तुम्ही काय करणार आहात?’ असा प्रश्न लातूर जिल्हय़ाच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांना विचारला आणि त्यांची भंबेरी उडाली.

पत्रकार बैठकीत सदाभाऊ खोत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. ‘शेतकऱ्यांचे होत असणारे नुकसान व शासन देत असलेली भरपाई याचे प्रमाण आपल्याला माहीत आहे, तेव्हा शेतकरी हितासाठी आपण काय करणार,’ असे विचारले आणि सदाभाऊ निरुत्तर झाले. ‘शेतकरी नेते आहात, किमान शेतकऱ्यांची वकिली करेन, मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडेन, असे तरी म्हणा, असे सुचवल्यानंतर ते म्हणाले, ‘तुम्ही असेच लिहा’, असे म्हणत त्यांनी पत्रकार बैठक आटोपती घेतली.

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडय़ातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्हय़ांतील २० लाख हेक्टरहून अधिक सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अतिवृष्टीनंतर सोयाबीनचे दर अडीच हजार रुपयांपर्यंत खाली आले. या पिकासाठी केंद्र सरकारने २ हजार ७७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. पूर्वी अतिवृष्टीमुळे ज्वारी काळी पडली तर सरकार ती खरेदी करत असे. आता सोयाबीनची प्रत घसरली असल्याने सरकारने सोयाबीन का खरेदी करू नये, असाही प्रश्न खोत यांना विचारला गेला. मुलुख मैदानी तोफ मूक झाली.

रेणापूर तालुक्यातील धवेली या गावातील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनचा कापणी अहवाल कृषी विभागाने सादर केला, तेव्हा दीड किलो सोयाबीन निघाले, तर विमा कंपनीने केलेल्या पाहणीत ते सात किलो निघाले. त्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून, ही तफावत तपासणार असल्याचे ते म्हणाले.