योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन

औरंगाबाद : स्वधर्मावर सध्या एकत्रितपणे हल्ला केला जात आहे. खरे तर भारत लोकशाही, त्यातील विविधता आणि विकास या तीन घटकांवर अवलंबून आहे. विविधता हा आपला धर्म आहे. तीन घटकांवर पूर्वीही हल्ले झाले पण ते एका घटकावर होत. आता या तिन्ही घटकांवर एकत्रित हल्ला केला जात आहे. असा हल्ला करणाऱ्यांचा राष्ट्रवाद हा जर्मन राष्ट्रवादावर अवलंबून आहे. त्यांना भारतीय स्वधर्म उमगलाच नाही. असे हल्ले परतवून लावण्यासाठी भारतीय परंपरेतील प्रतिसंस्कृतीची मांडणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात ते बोलत होते.

‘हिंदी- हिंदू- हिंदोस्तान’ ही राष्ट्रवादाची मांडणीच युरोपीय चष्म्यातून आली आहे. ती संकुचित आहे. इंग्रजांना वाटत होते की, या देशात ना एक धर्म आहे ना एक भाषा आहे. मग तुम्ही एक राष्ट्र कसे बनाल, त्यांच्या या प्रश्नाला अनेक वष्रे उत्तर देता आले नाही. त्या विचारसरणीतून ‘हिंदी- हिंदू- हिंदोस्तान’ अशी मांडणी सुरू  झाली. तो एक आजार बनावा अशी स्थिती आहे. त्याला उत्तर देण्याचे काम महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांनी केले. त्याला पुढे घेऊन जाणारी रचना उभी करावी लागणार आहे. ती उभी न राहिल्याने संकुचित राष्ट्रवादाची थाळी सजवून आपण कोणाच्या तरी हवाली करून टाकली. आता हा कसला राष्ट्रवाद असे आपणच विचारत राहतो. त्यामुळे भारतीय परंपरेतील विविधतेतून एकतेची मांडणी करण्यासाठी भारतीय परंपरेत, भाषेत असणारी प्रतिसंस्कृतीची मांडणी करण्याचे काम हाती घेण्याची गरज आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून हे काम अधिक महत्त्वाचे मानायला हवे असे योगेंद्र यादव म्हणाले.

युरोपातील अनेक देशात एकजिनसीपणाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे त्यांचे तुकडे झाले. आजही युरोप ४० देशांचा भाग आहे. पण अनेक विविधता असतानाही भारतात लोकशाही टिकली. भविष्यात भारताकडून विविधता सामावून घेण्याचा गुणधर्म जगाला उपयोगी पडणारा असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.

या पूर्वी देशाच्या लोकशाहीवर, विविधतेवर अनेकदा हल्ले झाले. अगदी आणीबाणीमध्येही अशाच प्रकारचा हल्ला होता. पण हे हल्ले तेव्हा सर्व बाजूने आणि एकदाच होत नव्हते. आता त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे अधिक सजगपणे काम करण्याची गरज आहे. राष्ट्र घडविण्यासाठी  सांस्कृतिक क्षेत्रात प्रती मांडणीचे काम करायला हवे, असेही ते म्हणाले.

डॉ. आ. ह साळुखे यांनी हा सत्कार आपण केलेल्या विचारांचा आणि मांडणीचा असल्याचे सांगत चार्वाकापासून चिकित्सा करायला शिकले पाहिजे आणि आपण हे शिकल्याचे सांगितले. वैचारिक सांस्कृतिक प्रतिमांडणी करण्याच्या प्रयत्नांचा सत्कार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्जुन जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. या वेळी व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण, अण्णासाहेब खंदारे, प्रा. ऋषीकेश कांबळे, के. ई हरिदास यांची उपस्थिती होती.

 

.