मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची पंकजा मुंडेंची माहिती

मराठवाडय़ातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता या प्रश्नावर औरंगाबादला मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या, हाताला काम दिले जात आहे. राजकीय द्वेषातून कोणी छावणी चालकांना वेठीस धरलेले सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करुन दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यात दुष्काळ मुक्तीसाठी सर्वानी मिळून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बीड जिल्ह्यतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी सकाळी सुरुवात केली. मुंडे यांनी तांबा राजुरी, आवळवाडी, रायमोहा, खोकरमोहासह अनेक गावांना आणि चारा छावण्यांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. तळेगाव येथे श्रमदानही केले. त्यानंतर बोलताना मंत्री मुंडे म्हणाल्या, यंदा जिल्ह्यत दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, पाऊस कमी पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. शासनाने दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्या आणि टँकर सुरू करून मदत करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र चारा छावण्यात कोणीही बोगसगिरी करू नये व राजकीय द्वेषातून छावणी चालकांनाही वेठीस धरले तर सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मंत्री मुंडे यांनी अनेक छावण्यांना भेट देत दुपारी खोकरमोहा येथील छावणीतच पशुपालक शेतकऱ्यांबरोबर दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यावेळी सात वर्षांपूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी छावणीत मुक्काम केल्याच्या आठवणी ताज्या झाल्या.

शहीद तौसिफ यांच्या कुटुंबीयांची भेट

नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाटोदा येथील तौसिफ शेख यांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी सकाळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने तौसिफ यांच्या कुटुंबीयांना हजयात्रेला पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

३२ हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प

पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आता सरकारने ३२ हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प तयार केला असून पुढील सात वर्षांत पाईपमधून शेतीला पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. पाऊस कमी पडला तरी दुष्काळी परिस्थिती जाणवणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.