आंबेडकरी व डाव्या संघटनांची मागणी

जिल्हाधिकारी ते मुख्य सचिवपदावर काम करताना राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी अनेक नियमबाहय़ कामे केली आहेत. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी व डाव्या परिवर्तन पक्ष संघटनेच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. आयुक्त गायकवाड यांना मारहाण केल्याप्रकरणी भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे परत घेण्यात यावेत, तसेच माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कामकाजाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

आंबेडकर भवन ही इमारत उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरलेल्या रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहावर धक्काबुक्की करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी आज केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत शांताबाई धुळे या महिला कार्यकर्तीला मार लागला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवर कारवाई झाली नाही. पोलिसांनी लावलेल्या कलमांवरही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले. कोणत्याही शासकीय कामासाठी रत्नाकर गायकवाड औरंगाबाद येथे आले नव्हते. तरीदेखील सरकारी कामात अडथळा यासाठी लावले जाणारे ३५३ हे कलमही पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपींवर लावले. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांचा सहभाग होता, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. वेगवेगळय़ा तीन मागण्यांसाठी मंगळवारी विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली.