सुहास सरदेशमुख

अट्टहासाने संगणकीय परीक्षा घेण्याच्या नादात २४ दिवस दोन सत्रात चाललेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत ई-महापरीक्षा या सरकारी कंपनीकडून प्रश्न चुकले. त्या चुकलेल्या प्रश्नांसाठी प्रत्येकी दोन गुण बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाच लाखांहून अधिक परीक्षार्थी उमेदवाराचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

या पदासाठी ४८ प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या होत्या. एका प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण अशी रचना होती. प्रत्येक सत्रासाठी नवी प्रश्नपत्रिका काढण्यात येत असल्याने काठिण्यपातळीवर उमेदवाराचे आक्षेप आहेत. त्यातच चुकलेल्या प्रश्नांना गुण देण्याच्या निर्णयामुळे लायक उमेदवार निवड यादीत मागे फेकले जाणार आहेत. ई-महापरीक्षा विभागाचे प्रकल्प संचालक दिनेश पाटील यांनीही काहीजणांवर असा अन्याय होऊ शकतो असे मान्य केले असून महसूल विभागाने चुकलेल्या प्रश्नांसाठी गुण देण्याचा निर्णय घेतल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद येथे तलाठी पदाची परीक्षा देणारे बालाजी कुटे म्हणाले,‘अशी विचित्र परीक्षा पद्धत कोठेच बघितली नाही. मी पहिल्या दिवशी २ जुल २०१९ रोजी परीक्षा दिली होती. त्या वेळी प्रश्नपत्रिकेत पाच प्रश्न चुकले होते. त्याचे गुण मिळतील पण ज्यांची प्रश्नपत्रिका चुकली नव्हती त्याच्यावर अन्याय होईल.’ पाच लाखांहून अधिक उमेदवारांनी दिलेल्या  परीक्षेवर काठिण्यपातळीवरही आक्षेप घेण्यात आले आहेत. मात्र, काठिण्यपातळीवरचे आक्षेप चुकीचे असून तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने प्रश्नसंच तयार करण्यात आले होते. त्यामुळे काठिण्यपातळी व सोपे प्रश्न याचे प्रमाण योग्य होते, असा दावा प्रकल्प संचालक दिनेश पाटील यांनी सांगितले.

घोळ काय?

राज्यभरातील रिक्त १८०० तलाठी पदांसाठी राज्यात २४ दिवस दोन सत्रात संगणकीय परीक्षा घेण्यात आली. संगणकांची पुरेशी संख्या नसल्याने प्रत्येक सत्रात नवी प्रश्नपत्रिका काढली जात असे. एका प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न असत. म्हणजे तलाठी परीक्षेत २४ दिवसात विचारलेल्या प्रश्नांची संख्या ४८०० एवढी झाली. यातील काही प्रश्न ई-महापरीक्षा विभागाकडूनच चुकले. म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या परीक्षेचे अंतिम गुणांकन वेगवेगळे झाले. चुकलेल्या प्रश्नाचे गुण बहाल करण्यात येणार असल्याने ज्यांची प्रश्नपत्रिका पूर्णत: बरोबर होती अशा उमेदवारांवर आपोआपच अन्याय होत आहे.