21 March 2019

News Flash

आता चिंचोकेही महागले!

बाजारात किलोला १८ रुपये ५० पैसे दर

|| प्रदीप नणंदकर

बाजारात किलोला १८ रुपये ५० पैसे दर

एकेकाळी पैशाबाबतच्या संवादात चिंचोक्याचे स्थान नगण्य असायचे. मात्र, एकेकाळी २५ पसे किलोने विकल्या जाणाऱ्या चिंचोक्याचा आजचा भाव आहे १८ रुपये ५० पैसे किलो. चिंचोक्यांचा भाव चक्क १ हजार ८५० रुपये क्विंटल एवढा वधारला आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी चढय़ा भावाने विकली जाते. सर्वाधिक भाव ज्या ज्वारीला मिळतो, अशी बडी ज्वारी आता १ हजार ८०० रुपये क्विंटल दराने विकली जात आहे.

लातूर बाजारपेठेत सध्या दररोज सुमारे एक हजार क्विंटल चिंचोक्याची आवक आहे तर बडी ज्वारीची आवकही एक हजार क्विंटलच आहे. ज्वारीपेक्षा चिंचोक्याला अधिक भाव असल्याचे लातूर बाजारपेठेतील व्यापारी राजगोपाल बियाणी यांनी सांगितले.

भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, झारखंड या सात राज्यांत प्रामुख्याने चिंचेचे उत्पादन होते. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात याला मानाचे स्थान आहे. आज बाजारपेठेत चिंच सरासरी १०० ते १२५ रुपये किलोने विकली जात आहे. पूर्वी चिंचोक्याचा फारसा वापर होत नसल्यामुळे दक्षिण भारतात जनावरांना खाद्य म्हणून चिंचोक्याचा वापर होत असे. आजही केरळ, तामिळनाडू या राज्यांत जनावरांबरोबर हत्तीला खायला चिंचोके दिले जातात. चिंचोका भाजून त्याचे टरफल काढून आतील पांढरा भाग कपडा तयार करणाऱ्या धाग्याला मजबुती मिळावी यासाठी वापरला जातो. त्याला साईजिंग असे म्हणतात. १९८० ते ९० पर्यंत प्रामुख्याने याच चिंचोक्याचा वापर होत असे. कपडय़ावर छपाई करताना गवारगमचा वापर सुरत व टेक्सटाईल बाजारपेठेत केला जात असे. १९९० च्या दशकात गवारगमचे भाव गगनाला भिडल्यामुळे पर्यायी म्हणून चिंचोक्याची पावडर डाईंगसाठी वापरली जाऊ लागली अन् चिंचोक्याला जगभर मागणी वाढली.

२००७ मध्ये ३५० रुपये क्विंटल चिंचोक्याचा भाव होता. तो गेल्या तीन वर्षांपासून १ हजार ७०० ते १ हजार ८०० रुपये स्थिर आहे. जगात भारताबरोबरच आफ्रिका व थायलंड या देशातही चिंच पिकते. मात्र, तेथे चिंचोक्यावर आपल्यासारखी प्रक्रिया होत नाही. सध्या टेक्सटाईल इंडस्ट्रीजमधून भारताला चिंचोक्याची पावडर निर्यात करून दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपये मिळतात.

जाम, आईस्क्रीम, सॉफ्टड्रींक, सूप अशा अन्नपदार्थाबरोबर औषधी वापराकडेही संशोधन वाढले आहे. डोळ्य़ात टाकण्याच्या औषधामध्ये चिंचोक्याचा वापर सुरू झाला असून त्यालाही मान्यता मिळते आहे. चिंचोक्याचा हा वापर वेगाने वाढला तर आजच्यापेक्षा चिंचोक्याला आणखी चांगला भाव मिळेल व कदाचित अन्य पिकांपेक्षा चिंच उत्पादनाला अधिक प्राधान्य दिले जाईल.

बाजारपेठेचे केंद्र बार्शी

१९७० पासून बार्शीत चिंचोक्यावर प्रक्रिया केली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान जसजसे बदलत गेले त्यानुसार येथे नवे बदल होत गेले. छाया इंडस्ट्रीजचे मनोहर सोमाणी यांनी आपल्या कारखान्यात वार्षकि १ हजार ५०० मेट्रीक टन प्रक्रिया केलेली चिंचोक्याची पावडर उत्पादित होते. त्यासाठी २ हजार ५०० मेट्रीक टन इतका चिंचोका खरेदी करतो. महाराष्ट्रातील लातूर, नगर, नाशिक, सोलापूर या परिसरातून चिंचोका येतो. याशिवाय देशातील सर्व प्रांतातून कमी-अधिक प्रमाणात आपण चिंचोका खरेदी करतो. आगामी काळात चिंचोक्याचे भाव आणखी वाढतील. भारतातील शेतकऱ्यांनी चिंचेच्या उत्पादनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कमी पाण्यात येणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्याला चांगले पसे मिळतील, असे सोमाणी म्हणाले.

First Published on June 3, 2018 1:02 am

Web Title: tamarind 2