गेल्या चार महिन्यांपासून लातूरकर पाण्याच्या प्रश्नावरून त्रस्त झाले आहेत. ‘पाण्याची चिंता नसलेला लातूरकर दाखवा अन् हजार रुपये मिळवा’ अशी जाहिरात केली तरी एकही माणूस पुढे येणार नाही. आता शहरातील सर्वच रुग्णालये पाणीटंचाईमुळे अडचणीत सापडली आहेत. टँकरने पाणी उपलब्ध करताना रुग्णालयांचीही मोठी कसरत होत आहे.
लातूरच्या मुख्य रस्त्यावर गेल्या २० वर्षांंपासून डॉ. दीपक गुगळे व मेघना गुगळे रुग्णालय चालवतात. डॉ. दीपक पोटविकारतज्ज्ञ, तर मेघना या प्रसूतिरोगतज्ज्ञ आहेत. रुग्णालयास ५४ वर्षांची परंपरा आहे. मात्र, या वर्षी पहिल्यांदाच पाणी प्रश्नामुळे रुग्णालय अडचणीत आल्याचे डॉ. दीपक सांगतात. ४० खाटांच्या या रुग्णालयात सुमारे ४५ कर्मचारी काम करतात. दररोज किमान ९ ते १० हजार लिटर पाणी रुग्णालयास लागते. दोन िवधनविहिरी व पालिकेचा नळ यावर पाणी पुरत असे. जानेवारीत दोन्ही िवधनविहिरी बंद पडल्यामुळे टँकरशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. गेल्या ३ महिन्यांपासून ६ हजार लिटरचा टँकर रोज घेतला जातो. एरवी रुग्णालयात २४ तास पाणी उपलब्ध असायचे. आता पाणीटंचाईमुळे सकाळी ४ तास व संध्याकाळी ४ तास तोटय़ांना पाणी असते. एरवी ते बंद केले जाते. पाण्याचा वापर कमी व्हावा, या साठी शौचालयातील फ्लश बंद करण्यात आले आहेत. नळाचा पाण्याचा वेग ५० टक्के कमी करण्यात आला आहे. शहर व ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यामुळे रुग्णांसोबत येणारे नातेवाईक भेटायला येऊन कपडे धुवून जात. आंघोळ करून जात, हे लक्षात आल्यामुळे पाण्याचा जपून वापर करा, असे सांगत एका रुग्णासोबत एकच नातेवाईक असा नियम करावा लागला. एखाद्या वसतिगृहात पर्यवेक्षक विद्यार्थ्यांची तपासणी करतात, तशी तपासणी आंतररुग्णांची करावी लागते.
दिवसातून तीन वेळा रुग्णालयाची साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यात आता दोन वेळा ओल्या कपडय़ाने फरशी पुसली जाते व एक वेळ कोरडय़ा कपडय़ाने साफ करून घेतली जाते. गेले वर्षभर दुष्काळामुळे आíथक उत्पन्न घटल्यामुळे नियोजित शस्त्रक्रियांमध्येही ७० टक्के घट झाली असून केवळ तातडीच्या शस्त्रक्रियाच रुग्णालयात होतात. त्यातही शासकीय रुग्णालयात किंवा राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेण्याकडे लोकांचा कल असतो. दुष्काळामुळे रुग्णालयात २० टक्के दर कमी केले आहेत, तरीही एकूण रुग्णसंख्येत २५ टक्क्य़ांपेक्षा अधिक घट झाल्याचे डॉ. गुगळे म्हणाले. गेल्या २० वर्षांपासून ४५ कर्मचारी काम करतात. परंतु आता सर्वाना सांभाळणे अवघड झाले आहे. एप्रिलपासून किमान १५ कर्मचारी कमी करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
सध्या एक टँकर पाणी नियमित मिळण्यासाठी सारखा पाठपुरावा करावा लागतो. आगामी दोन-अडीच महिने पाणी मिळण्यात अडचणी आल्या तर करायचे काय? आंतररुग्णांची भरती बंद करण्यास पर्याय राहणार नाही. शस्त्रक्रियेसाठी किमान १ हजार लिटर पाणी लागते. प्रसूतीसाठी अधिक लागते. पाण्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱ्या अडचणी अतिशय त्रासदायक असल्याचे गुगळे म्हणाले.
शहरात एमबीबीएस व त्यापेक्षा वरची पदवी असलेले ६५० डॉक्टर आहेत, तर बीएएमएस व बीएचएमएसची संख्या ५०० आहे. एकूण २ हजार खाटांची उपलब्धता शहरातील विविध रुग्णालयांत आहे. पाण्यामुळे सगळेच अडचणीत आले आहेत. जुने वैद्यक व्यावसायिक स्थलांतर करू शकत नाहीत. मात्र, नवी मंडळी भविष्यात पाणीटंचाई कमी झाली नाही, तर लातूरऐवजी दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार आतापासूनच करू लागली आहेत. लातुरात रुग्णांवर चांगले उपचार होतात याची अनुभूती परिसरातील अनेक रुग्णांनी घेतली आहे. परिसरातील मंडळींना यापुढेही हे उपचार सुरू ठेवण्यासाठी शहरातील रुग्णालयांवर जलोपचाराची गरज आहे.