अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे. औरंगाबादमध्ये मानाचा ‘संस्थान गणपती’ मार्गस्थ झाला असून घरगुती गणपतींचे जिल्हा परिषद मैदानाजवळील विहिरीत विसर्जन केले जात आहे. महापालिकेकडून याची व्यवस्था करण्यात आली आहे. विहरीत पाणी नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

विहिरीची साफसफाई केल्यानंतर रविवारपासून टँकरने विहिरीत पाणी सोडले जात आहे. बऱ्याच दिवसांपासून विहीर कोरडी असल्याने जास्त प्रमाणात पाणी लागत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. चार ते पाच टँकरने विहरीत पाणी सोडले जात आहे. शहरातील गणेशभक्त मोठ्या प्रमाणात या विहिरीत गणेश विसर्जनासाठी येत असतात. तसेच सार्वजनिक गणेश मंडळेही या विहिरीत गणेशाचे विसर्जन करतात.

गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून चोख तयारी करण्यात आली आहे. विहिरीच्या बाजूला सुरक्षा कठडा उभारण्यात आला आहे. तसेच चहूबाजूनी लाईट्सही लावण्यात आल्या आहे. मैदानावर गणेशभक्तांनी शिस्तीत यावे यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच गणरायासमोरील निर्माल्य घेण्यासाठी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तैनात आहेत. विहिरीतील पाणी पातळी कमी झाली की, टँकरने पाणी सोडण्याचे काम सुरु आहे.