News Flash

एका श्वासाचे अंतर ५५० किलोमीटर

मराठवाड्यात प्राणवायू व्यवस्थापन कंठाशी; आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून टँकर मिळविण्यासाठी धावाधाव

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

एका श्वासाचे अंतर किती? मराठवाड्यातील चार जिल्ह््यांसाठी ते सरासरी पाचशे किलोमीटरचे. कर्नाटकातील बेल्लारी येथून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह््यांतील प्राणवायू टँकरबरोबरच मराठवाड्यातील परभणी,  नांदेड, लातूर जिल्ह््यांसही द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा होईल म्हणून टँकरच्या रांगा लागल्या आहेत.

रात्री दोन वाजता उस्मानाबादला हैदराबादहून येणारा टँकर २४ तास उशिराने पोहोचेल असे सांगितले गेले आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर रात्री दोन वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात प्राणवायूचे सूक्ष्म व्यवस्थापन करत होते. जालना, लातूर जिल्ह््यांतून कसेबसे चार तास पुरतील एवढ्याच प्राणवायूच्या टाक्या मिळाल्या आणि प्रशासनाने तात्पुरता सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याच रात्रीतून मुख्य सचिवांशी चर्चा करून एक टँकर पुण्याहून उस्मानाबादला पोहोचला. अशीच स्थिती परभणी जिल्ह््याची होती. बेल्लारी येथील प्राणवायू व्यवस्थापकाशी बोलून रांगेत उभा असणारा टँकर भरून घेतल्यानंतर तो येईपर्यंत धाकधूक कायम होती. परभणीला टँकर पोहोचला. पण प्रत्येक तासात श्वासाचे अंतर वाढत आहे.

परभणी ते बेल्लारी हे अंतर ५६३ किलोमीटरचे. कोणतेही वाहन पोहोचण्याचा कालावधी साधारणत: १३ तासांचा. पण एक टँकर मिळाला तरी मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी सुटकेचा नि:श्वास सोडतात. प्राणवायू व्यवस्थापनातील या अडचणींविषयी बोलताना परभणीचे जिल्हाधिकारी म्हणाले, ‘काल रात्री प्राणवायू मिळणे अत्यंत आवश्यक होते. बेल्लारी येथील प्राणवायू उत्पादक कंपनीच्या प्रमुखाशी बोललो. निकड समजावून सांगितली. त्यांनी बाहेर रांगेत असलेला टँकर मग बोलावून घेतला आणि प्राणवायू मिळाला. खरे तर हे व्यवस्थापन अन्न व औषधी प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे. सध्या प्राणवायू मिळविण्यासाठी खूप धावाधाव होते आहे. प्राणवायूची स्थिती नाजूक असल्याचे आणखी एक उदाहरण उस्मानाबाद जिल्ह््यात मंगळवारी रात्री घडले. उस्मानाबादमधील रुग्णालयांना हैदराबादहून प्राणवायू पुरवठा होतो. हे अंतर ३२१ किलोमीटर. मंगळवारी रात्री हैदराबादहून प्राणवायू भरून येणारा टँकर तिथे कच्चा माल नसल्याने आला नाही. उस्मानाबादमधील स्थिती बिकट झाली. जिल्हा रुग्णालयात सर्व डॉक्टर रात्री एकत्र आले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरही पोहोचले. ज्या रुग्णांना कमी दाबाने प्राणवायू दिला जाऊ शकतो अशांची वर्गवारी करण्यात आली. प्राणवायूचा वापर आणि काटकसरीवर देखरेख करण्यात आली. हैदराबादहून प्राणवायू मिळणार नाहीच असे लक्षात आल्यानंतर मुख्य सचिवांशी बोलून रात्रीतून पुण्याहून साठा आणला आणि प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. उस्मानाबादमध्ये प्राणवायूवर ४०० रुग्ण आहेत.

निकड लक्षात घेऊन

प्राणवायू प्रकल्पापासून अंतर अधिक असणाऱ्या जिल्ह््यांंसाठी आणि निकड लक्षात घेऊन अन्न आणि औषध विभागाने प्राणवायू व्यवस्थापन करावे अशी मागणी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी करू लागले आहेत.

कर्नाटक, आंध्र प्रदेश मदतीला

कर्नाटकातील बेल्लारी आणि आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून मिळणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठ्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. पण हा पुरवठा किती दिवस होईल, हे मात्र सांगता येत नाही. बेल्लारीतून ३५ ते ४० टन प्राणवायू मिळू शकतो असे सांगण्यात येत आहे. तर हैदराबादहून नांदेड आणि उस्मानाबादला प्राणवायू पुरवठा होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:32 am

Web Title: tankers run from andhra pradesh and karnataka to get oxygen in marathwada abn 97
Next Stories
1 औरंगाबादमध्ये प्राणवायू गळतीचे लेखापरीक्षण सुरू
2 ‘कलाकारांनी कसे जगायचे ते सांगा?’
3 मराठवाडय़ात प्राणवायूसाठी कसरत सुरूच
Just Now!
X