सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

बर्फाच्या लादीवर एक लाल कापड व त्या भिजलेल्या कापडावर हिरवेगार पान. त्यात टाकायच्या वेगवेगळया सुगंधी सुपाऱ्या, मसाले, गुलकंद, कच्ची सुपारी खडा, भाजलेली सुपारी, कतरी सुपारी, वेगवेगळ्या सुगंधी द्रवपदार्थाच्या ओळीने मांडलेल्या बाटल्या, जर्दा, किवाम हे सगळे एका मखरात सजवल्यासारखे. बर्फावर ठेवलेल्या पानाला चंदेरी रंगाच्या आवरणातून काढत पान जमवून आणणारे दर्दी औरंगाबादमध्ये खूप. दिवसातले मोजकेच क्षण पानाशिवाय राहणारे इथे आहेत. करोना आला आणि हा सगळा पानाचा डौल या पुढे राहणार का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळत आहे. जिथे थुंकीतील एखादा थेंब चुकून उडाला तर प्रसार होतो, तिथे पान खाऊन सार्वत्रिक ठिकाणी पिंक टाकणाऱ्यांमुळे करोनाचा धोका नक्कीच वाढणार. त्यामुळे पान टपऱ्या सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

‘तारा पान सेंटर’ ही औरंगाबादची ओळख. पाच वर्षांपूर्वी इथून परदेशीही पाने पाठविली जायची. पण टाळेबंदीकाळात ही निर्यात पूर्णपणे थांबली आहे. दुसरीकडे कसुरी, कलकत्ता, बनारसी ही पाने विशिष्ट राज्यांतून यायची. टाळेबंदीमुळे ती येण्याची शक्यताही कमी आहे. ‘कोलकात्यामध्ये आता करोनाबरोबरच वादळाचेही संकट आहे. त्यामुळे तेथून पान येईल का, हे कसे सांगता येईल? आणि मोठय़ा कष्टाने त्यांनी पाठविले आणि पान लावून ग्राहकांना द्यायचे ठरले तर त्याला परवानगी मिळेल का? पण विषाणूचा प्रसार काय फक्त पानामुळेच होतो असे कसे? पान खाऊन थुंकता येणार नाही, हे खरेच. पण म्हणून पान विक्रीच करता येणार नाही, असे केले तर एकटय़ा औरंगाबादसारख्या शहरात ७५०० पान टपऱ्या आहेत, त्या सर्वाचे जगण्याचे प्रश्न गंभीर बनतील,’ असे तारा पानचे मालक शरफूभाई सांगत होते.