पावसाअभावी खरीप हंगामातील पिके गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा आधार मिळेल. या साठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. खत व बियाणे कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सांगून रब्बी हंगामासाठी २७१ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून बँकांनी शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिल्या आहेत. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे रब्बीची पेरणी करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाअभावी पाणीटंचाई व दुष्काळी स्थिती निर्माण झाली. खरिपाची पिके पावसाअभावी जळून गेली. दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाचाच आधार आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना २७१ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवले असून बँकांनी तत्काळ पीककर्ज द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. रब्बी हंगामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बठक घेतली. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, या साठी कृषी सहायकांनी सोशल मीडियावर ग्रुप करून संदेश द्यावेत, असेही बजावण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही स्थितीत खत आणि बियाणे कमी पडणार नाहीत याचे नियोजन कृषी विभागाने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, कृषी अधिकारी रमेश भताने, पी. एम. चांदवडे, कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. डी. माने उपस्थित होते.