News Flash

गृहविलगीकरणातील रुग्णांवर शिक्षकांची नजर

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश

(संग्रहित छायाचित्र)

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश

औरंगाबाद : करोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण गृहविलगीकरणात राहण्याची विनंती करतात. त्यांना तशी परवानगी दिली जाते. मात्र नंतर बाधित बाहेर फिरताना दिसून येत असून त्यातून संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील गृहविलगीकरणात राहिलेल्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्षात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी करोनाबाधितांची रुग्णसंख्या विचारात घेता २ ते ५ प्राथमिक शिक्षकांना नियुक्त करण्यात येईल. नियंत्रण कक्षास प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावनिहाय गृहविलगीकरणातील रुग्णांची यादी, त्यांचे मोबाइल फोन क्रमांकही उपलब्ध करून द्यावे लागतील. प्रत्येक दिवशी नव्याने गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांचा तपशीलही नियंत्रण कक्षाला द्यावा लागणार आहे. शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियंत्रण कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रऐवजी शाळेत स्थापन करण्यात येईल. कक्षात नियुक्त कर्मचाऱ्यास प्रत्येक दिवशी १० ते ५ या वेळेपर्यंत उपस्थित राहून संबंधित रुग्णास किमान एकदा संपर्क करून रुग्ण गृहविलगीकरणातच आहे किंवा कसे, याची खात्री करावी लागणार आहे. करोनाचा रुग्ण बाहेर पडत असेल तर तो साथरोग अधिनियमांन्वये कारवाईस पात्र ठरतो. गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीच्या घरात स्वतंत्र खोली नसेल तर त्याला शाळेची खोली उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. यासंदर्भातील आदेश औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी काढले आहेत. गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसाठीचा हा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २८ एप्रिल रोजी केलेल्या गंगापूर तालुका दौऱ्यादरम्यानच्या सूचनेनंतर काढल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांनी सांगितले.

तपासणी चौक्यांवरही शिक्षक

औरंगाबाद जिल्ह्य़ात अहमदनगर, जळगाव, बीड, बुलडाणा, जालना आदी लगतच्या जिल्ह्य़ांतून प्रवासी वाहने प्रवेश करत आहेत. तपासणी चौकीवर ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आंतर जिल्हा तपासणी चौक्यांवर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा व प्रत्येक चौकीवर जिल्हा परिषद कर्मचारी अथवा शिक्षकांना तेथे नियुक्त करावे. संबंधित शिक्षक योग्यरीत्या कर्तव्य बजावतो का नाही, याची खातरजमा करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:02 am

Web Title: teachers to keep eye on home isolation covid 19 patients zws 70
Next Stories
1 आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण
2 रेमडेसिविरचा तुटवडा कायम; घाटीमध्ये सलाईनची कमतरता
3 औरंगाबादमधील लस संपली; नव्याने सव्वा लाखांची मागणी
Just Now!
X