05 December 2019

News Flash

‘आयसिस’शी संबंधांवरून दहा जणांच्या पोलीस कोठडीत वाढ

औरंगाबादेतील मंदिर परिसरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये विष कालवण्याचा त्यांचा डाव होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद : मुंबईजवळच्या मुंब्रा उपनगरातून सहा आणि औरंगाबादेतून चार अशा दहा जणांना आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या काही हालचालींवरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात अटक केली होती. चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत स्फोटक माहिती समोर आली असून मंदिर परिसरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये विष कालवण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी पदार्थसुद्धा तयार केला असल्याचे एटीएसने मंगळवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असून विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी दहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.

दहशतवादविरोधी पथकाने २२ जानेवारी रोजी उमते महंमदीया ग्रुपच्या मुंब्रा आणि औरंगाबादेतील आयसिसशी संबंधित हालचाली करीत असल्याच्या संशयावरून मोहसीन सिराजुद्दीन खान (दमडी महल), महंमद मशाहिद उल इस्लाम (कैसर कॉलनी), महंमद सरफराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (राहत कॉलनी), महंमद तकी ऊर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (कैसर कॉलनी) एक विधिसंघर्ष बालक, ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड (मुंब्रा, ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान (मुंब्रा, ठाणे), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (अल्माश कॉलनी, मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख (मुंब्रा, ठाणे) यांना अटक केली होती. त्यानंतर तलहा ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरिक (रा. मुंब्रा) याला, अशा दहा जणांना अटक करण्यात आली होती.

या सर्वाची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांच्यासमोर हजर केले असता तपास अधिकाऱ्यांनी गेल्या चौदा दिवसांमध्ये आयसिसशी संबंधित असल्याबाबत समर्थकांकडून मोठय़ा प्रमाणात माहिती प्राप्त झाली असून त्यांच्या ताब्यातून संगणकांच्या हार्डडिस्क, विषारी द्रव्य जप्त करण्यात आलेले आहे.

मुंबई, पुणे आणि औरंगाबादेतील मंदिर परिसरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये विष कालवण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी विष टाकून तसे पदार्थही तयार केले असून ते पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. परदेशात त्यांनी कोणासोबत संपर्क साधला आहे, कोणाकडून इलेक्ट्रॉनिक डाटा प्राप्त केला आहे त्याची तपासणी करावयाची आहे, हार्डडिस्कचा पासवर्ड मिळवून ती उघडून तपास करावयाचा असल्यामुळे पोलीस कोठडीत वाढ द्यावी, अशी मागणी मुख्य सरकारी वकील अविनाश  देशपांडे यांनी केली. ही मागणी ग्रा धरून त्या उपरोक्त सर्वआरोपींच्या पोलीस कोठडीत १४ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.

First Published on February 6, 2019 1:17 am

Web Title: ten people arrested in connection with isis
Just Now!
X