येथील जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव व त्यांचा सहकारी कर्मचारी महेश थोरकर या दोघांना १० हजारांच्या लाचप्रकरणी शनिवारी वसमतच्या न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची एसीबी पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. त्यांच्या मूळ गावी आसू येथे घराची तपासणी केली जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पोपट जाधव यांनी कळमनुरी तालुक्यातील उमरा येथील ग्रामसेवकाच्या वार्षिक दफ्तर तपासणीत कोणत्याच प्रकारच्या त्रुटी न काढता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यासाठी १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी त्यांनी पंचायत विभागातील कर्मचारी महेश थोरकर यांच्याकडे १० हजार रुपये देण्याचे सुचवले होते. त्याप्रमाणे ग्रामसेवक दत्ता केंद्रे यांनी लाचेची रक्कम देताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचप्रकरणी दोघांना शुक्रवारी अटक केली होती.
िहगोली येथील न्यायालयाला शनिवारी सुट्टी असल्याने लाचखोर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव व त्यांचा सहकारी कर्मचारी थोरकर यांना वसमतच्या न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची एसीबी पोलीस कोठडी सुनावली. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या आसू या गावातील घराची तपासणी करण्याच्या सूचना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयास कळवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदांची संख्या मोठी आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पदभार होता. आता लाचप्रकरणात ते अडकल्याने येथील ही दोन्ही पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.