20 February 2019

News Flash

वैद्यकीय शिक्षणातील दहा हजारांवर जागा वाढवण्याचा निर्णय- नड्डा

इबोला या आजाराचा सामना करता करता अमेरिकेसह अनेक देशांना नाकीनऊ आले होते.

आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा

शासकीय वैद्यकीय महविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी येथे दिली. त्यात वैद्यकीय शिक्षणातील पदवीधारकांच्या १० हजारांवर तर पदव्युत्तरच्या ८ हजार ५०० जागा असतील. तर सध्याच्या १८ वैद्यकीय महाविद्यालयांतील एक हजार जागाही वाढवण्याचा निर्णयही झाला आहे. अशा प्रकारे देशातील ५८ वैद्यकीय महाविद्यालयांत ५ हजार ८०० तर ज्या तीन लोकसभेच्या जागांमध्ये मिळून एक वैद्यकीय महाविद्यालय, अशी देशातील २४ ठिकाणे निश्चित करण्यात आले असून, त्यात २ हजार ४०० जागा राहणार असल्याचेही नड्डा यांनी सांगितले.

औरंगाबादेतील कर्क रुग्णालयातील भाभा ट्रॉन-२ युनिटचे उद्घाटन व राज्य कर्करोग संस्थेच्या इमारत भूमिपूजनावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (शैक्षणिक) कैलास शर्मा, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी नड्डा म्हणाले, अकोला, यवतमाळ, औरंगाबाद व लातूर या ठिकाणच्या रुग्णालयांना सुपर स्पेशालिटीच्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. गोंदिया जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार असून, १८९ कोटी रुपयांचा निधी त्यासाठी दिला जाणार आहे, असेही नड्डा यांनी या वेळी सांगितले.

अमेरिकेपेक्षाही भारतातील वैद्यकीय सेवा चांगली

लोकसंख्येचा विचार केला तर भारतातील वैद्यकीय सेवा ही अमेरिकेसह प्रगत राष्ट्रांपेक्षा अधिक चांगली असल्याचा दावा आरोग्यमंत्री नड्डा यांनी केला. देशात दोन वर्षांत बालकांना सर्व लसी टोचल्या जातात. इबोला या आजाराचा सामना करता करता अमेरिकेसह अनेक देशांना नाकीनऊ आले होते. मात्र भारतात विमानतळावरच इबोलाच्या रुग्णाचा शोध घेऊन त्याला उपचारातून ठणठणीत करून घरी पाठवून देण्यात आले होते. यावरून भारतातील आरोग्यसेवा अधिक चांगली असल्याचे नड्डा यांनी सांगितले. याच वेळी उपस्थित डॉक्टरांमध्ये मात्र काहीतरी कुजबुज सुरू झाली होती.

First Published on February 12, 2018 2:06 am

Web Title: ten thousand seats increase in medical education say jp nadda