औरंगाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले पोस्टर फाडल्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही दगडफेकीच्या घटना घडल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोस्टर फाडल्याच्या या प्रकारामुळे शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी येथील कॅनॉट प्लेस परिसरातील दुकाने बंद पडली. दरम्यान, टी. व्ही. सेंटर भागात दगडफेकीची एक किरकोळ घटना घडली. त्याचबरोबर मुकुंदवाडी पोलिस स्‍टेशनसमोर जालन्‍याहून येणाऱ्या दोन बसवरही जमावाकडून दगडफेक करण्‍यात आली.

काही आक्रमक झालेल्या तरुणांनी यावेळी बॅनर फाडणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. दोन दिवसांमध्ये गुन्हेगारांना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच शहरातील तणाव काहीसा निवळला होता.

दरम्यान, बॅनर प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच शहरात शांतता राखण्याचे आवाहन करीत अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन औरंगाबादच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली घाटे यांनी केले आहे.