मतदारांना हातमोजे आणि मुखपट्टी लागणार; प्रचारावरही निर्बंधांची मार्गदर्शिका

औरंगाबाद : कोविड काळात येणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना हातमोजे आणि मुखपट्टय़ा प्रशासनाकडून पुरविण्याच्या हालचालींची चाचपणी केली जात आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदानादरम्यान पसंतीचा प्राधान्यक्रम अशा प्रकारचे मतदान करावयाचे असल्याने एकच पेन मतदारांना वापरावा लागेल. तसेच मतपत्रिकेच्या घडय़ा घालतानाही बरीच हाताळणी करावी लागत असल्याने मतदारांनाही मुखपट्टी आणि हातमोजे प्रशासनाकडून द्यावे लागतील काय, याची चाचपणी केली जात आहे. या मतदार संघात पावणेचार लाख मतदारांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी   विजय मिळविला होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार ठरविण्यासाठी भाजपमध्ये बैठक सत्र सुरू आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. अधिसूचना जाहीर होण्यापूर्वी कोविड काळातील ही निवडणूक कशी घ्यावी याच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आखणीला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्र किती असावीत, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची काळजी कशी घ्यावी याचा अंदाज घेतला जात आहे.

मतपत्रिकांसह केंद्रावर पोहोचण्यासाठी पूर्वी केली जाणारी व्यवस्था या पुढे लागू होणार नाही. कमीत कमी कर्मचारी एका वाहनातून पाठविले जाणार असून मतदारांनाही हातमोजे आणि मुखपट्टी वापरावाी लागणार आहे. या निवडणुकीच्या जाहीर प्रचारावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना लागू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवर सचिव शुभा बोरकर यांनी या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांना मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य अधिकाऱ्यास समन्वय अधिकारी म्हणून नेमले जाणार असून मतदानादिवशी  मतदान केंद्रावर आता आरोग्य कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्याच बरोबर जवळच्या कोविड केंद्राचे दूरध्वनी क्रमांक, रुग्णवाहिका आदीची सोयही निवडणुकीदरम्यान करावी लागणार आहे. मतदारांची भेट घेताना उमेदवारासह पाच व्यक्ती आणि सुरक्षा रक्षक यांचाच समावेश केला जाणार आहे.

या निवडणुका प्रस्तावित..

राज्यातील दोन शिक्षक मतदार संघ आणि तीन पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रस्तावित आहे. औरंगाबाद , पुणे व नागपूर विभागात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका तर अमरावती आणि पुणे विभागात शिक्षक मतदार संघांची निवडणूक प्रस्तावित आहे. येत्या काही दिवसांत या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.