|| बिपीन देशपांडे

हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमांना काटकसरीच्या कळा  :- सततच्या दुष्काळाशी सामना करावा लागलेल्या ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. दुष्काळाची झळ लग्न सोहळ्यांसह सात्त्विक विचारांचा संस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिनाम सप्ताहासारख्या कार्यक्रमांनाही बसत आहे. असे सर्वच धार्मिक कार्यक्रम ‘काटकसरी’ने उरकावे लागत आहेत.

कीर्तनकार ते टाळकरी यांना दुष्काळाचे तर कधी अतिवृष्टीचे कारण पुढे करत जमेल तेवढय़ा ‘बिदागी’त (संभावना) ‘सेवे’साठी आणावे लागत आहे. वारकरी सांप्रदायात अलीकडे ‘बिदागी’ला ‘संभावना’, असा शब्द वापरला जातो, जो सेवाअर्थाने घेतला जातो.दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्याची परंपरा ग्रामीण भागाने सुरू ठेवली जाते. त्यासाठी गावातील डोकेनिहाय किंवा जमिनीच्या एकर क्षेत्रनिहाय वर्गणी जमा करण्याची रुढ पद्धत आहे. अशी वर्गणी जमा करणाऱ्यांची जबाबदारी गावातील काही विशिष्ट मंडळींवर सोपवलेली असते.

हरिनाम सप्ताहाचे नियोजन मंडप, दररोजचा भंडारा, एकादशी असेल फराळाच्या सोयीपासून ते कीर्तनकार, टाळकरी, मृदंगाचार्य, विणेकरी, यांच्या बिदागीपर्यंतचा विचार करून करावे लागते. त्यासंदर्भातील खर्चाचा लेखाजोखा आयोजकांमधील मंडळींवर असतो. मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे वर्गणी जमा करणाऱ्यांना खर्चाचा ताळमेळ बसवणे अलीकडे अडचणीचे ठरत आहे. त्यांना सप्ताहाच्या अपेक्षित खर्चाएवढी रक्कम जमा होत नसल्यामुळे कमी खर्चातील कीर्तनकारांचा शोध घेऊन त्यांना निमंत्रित करावे लागत आहे. सप्ताहात बाहेरगावचे टाळकरी, मृदंगाचार्यही आणले जातात. तेही स्थानिक किंवा नजीकच्या गावातीलच आणावे लागत आहेत.

शेतकरी गांजलेला आहे. लोकं दुखी आहेत. दुष्काळी परिस्थितीचे चित्र ग्रामीण भागात फिरताना स्पष्टपणे दिसत आहे. सप्ताहात जिथे दोन-चार पखवाजवादक बोलावले जातात तिथे, त्यांची संख्या कमी केली जाते आहे. लोक कीर्तनाचा रसास्वाद घेतात, पण वर्गणी देऊ शकत नाहीत. अर्थव्यवस्थाच मूळ शेतीवर आधारित आहे. – भरतबुवा रामदासी, ज्येष्ठ कीर्तनकार

हरिनाम सप्ताहाकडे संस्काराचा भाग म्हणून पाहिले जाते. सप्ताहाच्या काळात गावातला माणूस सात दिवस मांसाहार वर्ज्य  करतो. किंवा मांसाहार केला तर गावात येण्याचे टाळतो. मद्यापासूनही दूर राहातो. गावातील पूर्वीच्या एखाद्या महात्म्याच्या आदेशाने सप्ताह  चालवण्यात येतो. त्यामागे काही धार्मिक कारण असले तरी दुष्काळी परिस्थितीचा ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर परिणाम झालेला असून सप्ताहासारख्या कार्यक्रमांचे आटोपशीर नियोजन केले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. – दत्तात्रय आंधळे महाराज.