लोकसत्ताच्या वृत्ताचा परिणाम

औरंगाबाद : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणची ११० झाडे न तोडता सुधारित नकाशा तयार करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी सिडको प्रशासनाला केल्या आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक वृक्षतोडीविना तर मुंडे यांचे स्मारक वृक्षतोड करून उभारण्यात येणार असल्याच्या संदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये वृक्ष लावा तोंडी, वृक्ष तोडा लेखी, या मथळ्याखाली ११ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित झाले होते.

औरंगाबाद महानगरपालिकेने एकीकडे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या ठिकाणची झाडे तोडण्याच्या संदर्भाने जाहिरात प्रकाशित करून आक्षेप मागवले होते. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कुठलीही वृक्षतोड न करता करण्याचा निर्णय घेतला आहे.

चारच दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आणि एकही वृक्षतोड न करता स्मारक उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे जालना रोडवरील दूध डेअरी परिसरात करण्यात येणाऱ्या स्मारकाच्या ठिकाणचे वृक्ष मात्र तोडण्यासाठी जाहिरात प्रकाशित करून आक्षेप मागवण्याची महानगरपालिकेची कृती विसंगत वाटत असल्याकडे ‘लोकसत्ता’तील वृत्तातून लक्ष वेधले होते.

या वृत्तानंतर दोनच दिवसात महानगरपालिकेने आपला निर्णय फिरवला. मनपा उपायुक्तांनी १३ जानेवारी रोजी एक पत्र पाठवून सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना कळवले की, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबत आयुक्तांशी सविस्तर चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने नियोजित मुंडे स्मारकाच्या परिसरातील झाडे न तोडता या प्रकल्पाचा सुधारित नकाशा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून  त्यानुसारच  पुढील कार्यवाही करावी, असे त्या पत्रात म्हटले आहे.