पूर्णेपासून जवळच असलेल्या निळा गावात शुक्रवारी दुपारच्या सुमारास शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ घरे जळाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत दोन बल व गाय भाजल्याने गंभीर जखमी झाली. अग्निशामक दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली.
दुपारी दोनच्या सुमारास घरांना आग लागली. महावितरणच्या रोहित्रात अचानक आग लागली. आगीने १५ घरांना वेढा घातला. यादव सुके, िलबाजी सुके, अनंता सुके, भगवान सुके, दत्तराव सुके व गंगाधर सुके आदींच्या घरांतील धान्य, संसारोपयोगी वस्तुंची राखरांगोळी झाली. घरांना आग लागल्याने गावात हाहाकार उडाला. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंत, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग विझविण्याचे प्रयत्न अपुरे पडू लागले. दरम्यान, पूर्णा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलासही आग विझवण्यास मोठे प्रयत्न करावे लागले. आग विझेपर्यंत १० ते १५ घरांची राखरांगोळी झाली. माहिती मिळताच तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे, तलाठी उंकडे, ग्रामसेवक कांबळे घटनास्थळी दाखल झाले. तलाठी उंकडे यांनी पंचनामा केला. आगीत झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.