येथील शासकीय विश्रामगृहाच्या तिसऱ्या माळ्यावर आग लागून गाद्या, लोखंडी, लाकडी कपाट, कपडे, इन्व्हर्टर, बॅटरी, गिझर आदी साहित्य जळून खाक झाले. सुमारे सात-आठ लाखांवर मालमत्तेचे नुकसान झाले. नगरपालिकेचे अग्निशामक दल वेळीच पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र, आग विझविण्याच्या प्रयत्नात खिडक्यांच्या काचा, फरशा तुटून खालच्या दोन्ही मजल्यांवर सर्वत्र पाणी जमले होते.
शहराच्या मध्यभागी असलेल्या शासकीय विश्रामगृहातील तिसऱ्या माळ्यावर शनिवारी सकाळी ही आग लागली. विश्रामगृहात असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र अकरापर्यंत याचा थांग लागला नव्हता. धुराचे लोळ बाहेरच्या लोकांना दिसल्यावर मोठय़ा संख्येने ते विश्रामगृहाकडे धावले, तेव्हा कोठे विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळविताच अग्निशामक दलासोबत उपनगराध्यक्ष जगजीत खुराणा आदी घटनास्थळी हजर होऊन सर्वानी आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले.
उपविभागीय अधिकारी राहुल खांडेभराड, तहसीलदार किरण आंबेकर, पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीत तिसऱ्या माळ्यावर ठेवलेले लाकडी पलंग ५, लाकडी कपाट ३, सोफासेट ४, लोखंडी कपाट ४, पाणी तापविण्याचे गिझर, खुच्र्या, इन्व्हर्टर व बॅटरी प्रत्येकी ८, डायिनग डेबल, खुच्र्या कपाटातील सोलापुरी चादरी, बेडसिट, गाद्या आदी साहित्य जळून खाक होऊन सुमारे ७ ते ८ लाखांवर नुकसान झाल्याचे विश्रामगृहातील कर्मचारी घाटोळ यांनी सांगितले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.