भारतीय समाजात आजही स्त्रीला पोटभाडेकरूची वागणूक दिली जाते. या व्यवस्थेत व मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. भारतीय समाजमानस आजारी असून, त्यासाठी ताराबाई िशदे स्त्री अभ्यास केंद्र इस्पितळाची भूमिका अदा करत आहे, असे प्रतिपादन जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई िशदे स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉ. प्रतिभा अहिरे होत्या. डॉ. गव्हाणे म्हणाले, की महाराष्ट्र आणि देशात महिलांवर अमानुष अत्याचार वाढत आहेत. देश गुन्हेगारांचे हब बनत आहे. त्यावर मुळापासूनच उपाय व उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजाची, पुरुषाची नजर आणि मनोवृत्ती शुद्ध करण्यासाठी स्त्री अभ्यास केंद्राची नितांत गरज आहे. या केंद्राकडे विषमतावादी दृष्टिकोन असणाऱ्यांनी येण्याची गरज अधिक आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनात परिवर्तन घडून येईल. समाजपरिवर्तनाच्या ज्वाला कोणालाही थांबवता येत नाहीत. या प्रक्रियेत स्त्री अभ्यास केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, की २००५ मध्ये ताराबाई िशदे स्त्री अभ्यास केंद्र विद्यापीठात सुरू झाले. माजी विद्यार्थ्यांचा हा पहिलाच मेळावा आहे. पुढील वाटचालीला दिशा आणि ऊर्जा मिळावी हा या मेळाव्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश लोणकर यांनी केले.