म्हैसमाळच्या भिल्ल वस्तीतील विदारक चित्र

कुडाचं घर, चहूबाजूंनी पालापाचोळय़ाच्या आडोशाचं. म्हैसमाळ येथील भिल्ल वस्तीत रावसाहेब मोरे राहतात. व्यवसाय तसा सांगायला ऊसतोडीचा. पण गुजराण हातभट्टीची दारू गाळून. घरात  एक पलंग, त्यावर गोधडी, मोजून चार भांडी. एक लोखंडी ट्रंक, मळकट लाकडी कपाट. त्यात मेणकापडाच्या पिशवीत आधारकार्ड आणि पिवळं रेशनकार्ड जपून ठेवलेलं. आधारकार्ड ई-पॉस मशिनला न जोडल्याने रेशन अडीच महिन्यांपूर्वीच बंद झाले. याच काळात त्यांना स्वच्छ भारत मिशनचे आयते बांधलेले स्वच्छतागृह मात्र मिळाले. कुडाच्या घराशेजारी सिमेंटचे स्वच्छतागृह, तेही रेशन मिळत नसताना! सरकारी यंत्रणांचे प्राधान्यक्रम हे असे असतात.

औरंगाबादजवळच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध म्हैसमाळमध्ये भिल्ल समाजाची मोठी वस्ती. प्रत्येकाकडे रोजगार हमीतले जॉब कार्ड. पण काम कोणालाच नाही.  पत्नी नंदा व रावसाहेब ऊसतोडीला पुणे जिल्ह्य़ात गेले, की आई राधाबाई मुलांना सांभाळते. रावसाहेबांना चार मुली आणि दोन मुलगे. खाणारी तोंडं ही एवढी. रावसाहेब सांगत होते, दुसरा कोणता व्यवसाय करणार? पण मी काही दारू गाळत नाही. १० रुपयाला एक ग्लास, या किमतीत दारू विकणेही परवडत नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रेशन मिळायचं बंद झालं आहे. राधाबाईची आणि नंदा मोरेची मोठी घालमेल होते. त्यांचा रेशनचा प्रश्न यंत्रणेला मात्र महत्त्वाचा वाटत नाही. त्यांच्या लेखी ‘स्वच्छ भारत मिशन’ महत्त्वाचे. जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या १२ हजार रुपयांच्या निधीतून सिमेंटचे स्वच्छतागृह रावसाहेबांच्या कुडाच्या घराच्या शेजारी ठेवण्यात आले. वस्तीतल्या बहुतेक कुडांच्या घराबाहेर ‘स्वच्छ भारत मिशन’ पोहोचले. खुलताबाद तालुका ‘ओपन डिफेक्शन’ मुक्त झाला. तशी घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनच्या सचिवांसमोर करण्यात आली. म्हैसमाळच्या रावसाहेबांनी स्वच्छतागृहाच्या भांडय़ात एक पोते कोंबून टाकले. सरकारची योजना पूर्ण झाली. रेशन मिळत नाही, अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्यांना रावसाहेबांनी कधी केली नाही. त्यांचे आधारकार्ड काही जोडले गेले नाही. घरकुलाच्या यादीत काही भिल्ल समाजातील व्यक्तींना लाभ मिळाला. तशी दोन-तीन घरं आहेत. पण बहुतांश कुडांच्या घरासमोर सिमेंटचे स्वच्छतागृह असे चित्र सरकारी प्राधान्यक्रमता अधोरेखित करणारे आहे.