शापूर्जी पालनजी कंपनीतील साहित्य हरवल्याची तक्रार

औरंगाबाद : शापूर्जी-पालनजी या कंपनीचे शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून चोरीस गेलेल्या साहित्याची किंमत पावणे दोन कोटींवर असताना करमाड पोलीस ठाण्यात या संदर्भात प्रारंभी अदखल पात्र गुन्ह्यची नोंद केली. कंपनीकडून याची माहिती थेट जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यापर्यंत पोहोचविल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविल्याने प्रकरणाचा छडा तर लावलाच शिवाय करमाड पोलिसांची हातचलाखी समोर आणली.

शेंद्रा बिडकिन औद्योगिक वसाहत विकासाचे काम शापूर्जी -पालनजी या कंपनीला देण्यात आलेले आहे. कंपनीचे कार्यालय हे शेंद्रा औद्योगिक वसाहत भागात असून ७ सप्टेंबर २०१९ रोजी तेथून अ‍ॅल्युमिनियम तारांची जवळपास १५ बंडल्स व इतर साहित्य चोरीस गेले. ज्याची किंमत एक कोटी ८५ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. या चोरीस गेलेल्या मालाचा शोध कंपनीस्तरावर घेण्यात आला. मात्र त्याचा शोध लागत नसल्याने ७ डिसेंबर रोजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक वसीम खुर्शीद शेख यांनी करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, प्रारंभी ३७९ कलमाखाली तक्रारीची नोंद करण्यात आली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना ई-मेलद्वारे संपर्क करून घडलेला प्रकार कळविण्यात आला. त्याची दखल घेत आणि करमाड पोलिसांची चलाखी ओळखून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवले. स्थानिक गुन्हे शाखेने याच प्रकरणात पप्पू आणि फत्रू नावांच्या आरोपींना अटक केली. त्यानंतर या प्रकरणी पुन्हा जवळपास १५ अ‍ॅल्युमिनियम तारेचे बंडल व इतर काही साहित्य चोरीस गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली. यामध्ये चोरीस गेलेल्या मालाची रक्कम जवळपास एक कोटी ८५ लाख रुपयांची आहे. मात्र, यामध्ये स्थानिक पोलीस निरीक्षकांनी घटना नोंद करण्यात चलाखी केल्याचे उघड  झाल्याने त्यांच्यावर कारवाई म्हणून केवळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. मात्र, त्यांनी नियंत्रण कक्षात रुजू होण्याऐवजी आजारी रजेवर जाणे पसंत केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.