जगभरात बदलेल्या विषाणूचा कहर सुरू असला, तरी अद्याप नव्या करोना विषाणूचा एकही रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळलेला नसल्याची माहिती अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ब्रिटनमधून येणारी विमाने देशात सर्वात अगोदर महाराष्ट्राने थांबविली, त्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला, असेही टोपे म्हणाले.

आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये रूपांतरित झालेल्या करोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. राज्यात दुसरी लाट थांबविण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावाही टोपे यांनी केला. कोविडच्या महासंकटातही एमआयटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना जीवदान मिळाले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या एमआयटीच्या डॉक्टर आणि चमूचे आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केले. या प्रसंगी एमआयटी संस्थेचे महासंचालक प्रा. मुनीष शर्मा, डॉ. सुहास बावीस्कर, डॉ. राजेंद्र प्रधान, डॉ. प्रशांत दरख, डॉ. अतुल सोनी, डॉ. प्रमोद अपसिंगेकर आदींची उपस्थिती होती.

कोविडसंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करत एमआयटीमध्ये करण्यात आलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे, हे काम संशोधनासाठीही उपयुक्त आहे, असेही टोपे म्हणाले. ब्रिटनहून संभाजीनगर शहरात आलेल्या प्रवाशांचे घशातील स्राव घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यास दिरंगाई होत असल्याचे लक्षात आले तर त्याची चौकशी केली जाईल, असेही टोपे म्हणाले.