औरंगाबादमध्ये अनेक कामं करायची इच्छा होती. पण सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारच्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील, असा आशावाद व्यक्त करत पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी इच्छा ही व्यक्त केली.

विधानसभेचे आज कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरून गदारोळ घातला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी याप्रश्नी सरकारला धारेवर धरले. पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांवर कारवाई करावी व नागरिकांच्या घरांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. विरोधकांच्या दबावामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्या पार्श्वभूमीवर यादव यांच्याशी संवाद साधण्यात आला.

आपल्या ३२५ दिवसांच्या कार्यकाळात गुन्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली असल्याचा दावा करताना ते म्हणाले, शहरात ४०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यातून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांना या घटनांचा छडा लावण्यात यश आले. १२५ कोटी रूपयांचा निधी शहरात सीसीटीव्हीसाठी आलेला आहे. ते काम पूर्ण करायच होते. आता नवीन अधिकारी त्या कामाला गती देतील, असा आशावाद व्यक्त करत औरंगाबाद मधील कामाचा अनुभव चांगला राहिला. आता पुन्हा औरंगाबादेत येण्यापेक्षा नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करायला आवडेल. इथे पुन्हा आल्यानंतर पूर्वग्रहदूषित मनाने काम केले जाईल, असा ठपका ठेवला जाईल म्हणून पुन्हा औरंगाबादमध्ये  यायला नको, असे त्यांनी म्हटले.

मिटमिटा भागात पोलिसांनी जी दगडफेक केली होती. त्याची चौकशी सुरू असून यापुढे ती सुरू ठेवायची का नाही. याबाबत नवीन येणारे अधिकारी निर्णय घेतील. आगामी काळात लोक अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर येतील. त्यामुळे कायद्याचा प्रश्न निर्माण होईल, अशावेळी पोलिसांचे मनोबल वाढायला हवे, ते वाढले तरच सर्व अबाधित राहील आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार नाही. त्यासाठी मनोबल खच्ची व्हायला नको असेही ते म्हणाले.