वैजापूर, गंगापूर तालुक्यात पूरस्थिती

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून या स्थितीमुळे खबरदारी म्हणून वैजापूर तालुक्यातील नदीकाठची २३ गावे व गंगापूर तालुक्यातील कृषिपंपांचा विद्युतपुरवठा रविवारी रात्रीपासून बंद ठेवण्यात आला होता. मात्र यातील दहा गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी दिली.

दरम्यान, यापूर्वी रविवारपासून दोन्ही तालुक्यांतील ६५८ रोहित्रांवरील ३ हजार ७५४ कृषिपंप व ५ हजार ५६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते.

मात्र यातील बाराशे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांपैकी ८१५ ग्राहकांचा व सुमारे ९७६ कृषिपंप ग्राहकांपैकी जवळपास ६७५ ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारी पूर्ववत करण्यात आला आहे.

पुराचे पाणी ओसरल्यास इतर ठिकाणचाही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे वैजापूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी सांगितले.

गंगापूर तालुक्यातील कानडगाव येथील वीज उपकेंद्राच्या आवारात पुराचे पाणी शिरल्यामुळे नेवरगाव, कानडगाव व हैबतपूरचा वीजपुरवठा जामगाव उपकेंद्रातून पर्यायी वाहिनीद्वारे सुरू करण्यात आला आहे, असे गंगापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, पुरामुळे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील स्थलांतरित व्यक्तींना मंगळवारी दिवसभरात रेशन व पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती.

उपविभागीय अधिकारी संदीप सानप यांनी दोन्ही तालुक्यांतील पूरग्रस्त गावांचा दौरा केला. कोणत्याही गावामध्ये समस्या नसल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

जायकवाडीत ४३.२२ टक्के पाणी

नाशिक जिल्ह्य़ातील पुरामुळे जायकवाडी जलाशयात आलेल्या पाण्यामुळे उपयुक्त जलसाठय़ात वाढ झाली असून मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ४३.२२ टक्के पाणीसाठा झाला होता. पुढील दोन दिवसांत धरण ६० टक्क्य़ांपर्यंत भरेल, असा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. दोन लाख २० हजार ५०० क्युसेक वेगाने जायकवाडी जलाशयात पाणी येत असून आतापर्यंत ९३८.२८८ दलघमी म्हणजे ३३.१३ टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये दाखल झाले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.