23 November 2020

News Flash

मराठवाडय़ात १५ हजार परप्रांतीय अडकले

९० शिबिरांतून व्यवस्था, तरुणांची मानसिकता मात्र पळण्याची

करोनाभयामुळे परराज्यातून आणि विविध जिल्ह्यंतून अडकलेल्या व्यक्तींची संख्या १५ हजार ३५४ असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या सर्वाची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यतील ९० शिबिरांमध्ये करण्यात आली आहे. अडकलेल्या व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था सध्या स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यात आली असून पुढील काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून जिल्हाधिकारी पुढील व्यवस्था करत असल्याचे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान परराज्यातून अडकलेल्या सर्वाधिक व्यक्ती पंजाब प्रांतातील असून त्या सध्या नांदेडच्या गुरुव्दारात आहेत. उर्वरित व्यक्तींची व्यवस्था शाळांमध्ये तसेच इतर सरकारी इमारतींमध्ये केली जात आहे. सारी व्यवस्था केली जात असतानाही काही तरुण पुन्हा पळून गेले आहेत. त्यांचाही शोध नव्याने सुरू करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यत विविध राज्यातून आलेले सुमारे ७ हजार १९७ व्यक्ती अडकलेल्या असून त्यांची १९ शिबिरांमध्ये सोय केली जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार या भागातून बरेच मजूर औरंगाबाद जिल्ह्यत औद्योगिक वसाहतीसाठी आणि अगदी कापूस वेचणी व विहिरी खणण्यासाठी येत असतात. त्यातील काहीजण अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यत १८०२ जणांना २८ शिबिरांमध्ये, परभणी जिल्ह्यत २२८ व्यक्तींची पाच शिबिरांमध्ये, हिंगोलीमध्ये नऊ शिबिरांमध्ये १ हजार २६१, बीड जिल्ह्यत पाच शिबिरांमध्ये ३९४ जणांची, उस्मानाबादमध्ये सात शिबिरांमध्ये ९६६, लातूर १३ शिबिरांमध्ये ९१० व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वाची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यातील ज्यांना सर्दी किंवा खोकला आहे अशा व्यक्तींना उपकेंद्रांमध्ये पुढील तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. या व्यक्तींचा भोजनाची सोयही करण्यात आली आहे. तसेच झोपण्याच्या ठिकाणी सतरंजी व पांघरूण दिले जात आहे.

एका बाजूला या व्यवस्था केल्या जात असतानाही काहीजण नाहक बाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे.

११ अहवाल नकारात्मक

औरंगाबाद शहरात करोना चाचणीसाठी घेण्यात आलेले ११ लाळेच्या नमुन्याचे अहवाल नकारात्मक आले आहेत. सोमवारी ११ जणांची पुन्हा चाचणी घेण्यात आली आहे. सध्या १२ व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेच्या १५१ चमूनी ७२ हजार घरातून तपासणी केली असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:33 am

Web Title: thousands of foreigners were trapped in marathwada abn 97
Next Stories
1 औरंगाबादकरांच्या दारी, भाजीपाल्यासह धान्य-फळांची शिदोरी
2 रक्ताच्या तुटवडय़ाने थॅलेसेमियाग्रस्तांचे कुटुंबीय चिंतित
3 हमालांची कमतरता, खतांचा साठा रेल्वे वाघिणींमध्येच
Just Now!
X