औरंगाबाद : यंदा करोना सावटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्य़ात एक हजार ७८ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही. तर २०८ गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

जिल्ह्य़ात गतवर्षी (२०१९) परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या १ हजार ५२४ एवढी होती. यामध्ये १५२४ पैकी ५२२ गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना उत्स्फूर्तपणे राबवण्यात आली होती.

यंदा औरंगाबाद जिल्ह्य़ात करोनाचा वाढता प्रसार पाहता वैजापूर, गंगापूर आदी ठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व मोहरमबाबत सर्व धर्मीय शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेऊन समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, व्यापारी, लोकप्रतिनिधी, नागरिक व गणेश मंडळांचे प्रतिनिधी यांचीही बैठक घेऊन करोनाबाबची जनजागृती करण्यात आली. या वेळी गणेश मूर्तीची स्थापना न करण्याबाबत आवाहन केले होते. तसेच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जमा केलेल्या वर्गणींचा उपयोग समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी करावा, असेही प्रेरित केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्य़ात केवळ ४४६ मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. तर त्यातीलही २०८ गावांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवली. जिल्ह्य़ातील १ हजार ७८ सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही. या संदर्भात गावच्या स्थानिक ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन त्याबाबत पोलीस मुख्यालयाला लेखी कळवल्याचे अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.

चिकलठाणा-२, बिडकीन ८, एम. पैठण-४, या सारख्या मोठय़ा लोकवस्तीच्या भागातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. कन्नड ग्रामीण, करमाड, फर्दापूर, कन्नड शहर, शिल्लेगाव या अंतर्गत एकही सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन नसून सार्वजनिक स्तरावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नाही. जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्यांतर्गतमधील पैठण-३९, पाचोड-५९, फुलंब्री ४२, वडोदबाडार-१४, सिल्लोड शहर-२४ तर सिल्लोड ग्रामीण-३०, अजिंठा-२७, सोयगाव १७, पिशोर-४२, खुलताबाद-२२, वैजापूर-२७, शिऊर-२७, वीरगाव-१७, गंगापूर २७, देवगाव (रं)-२०, या नुसार सार्वजनिक गणेश मंडळे असून बहुतांश ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पनेनुसार मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.