21 October 2018

News Flash

पर्यावरण खात्यामुळे हजारो कामगारांचे भवितव्य टांगणीला!

क्विंटलमागे लाकडाचे दर वाढले

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पर्यावरणाच्या मुद्दय़ावर ‘जागृत’ असलेले पर्यावरणमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदासभाई कदम यांच्या पर्यावरण खात्याने प्रदूषणाच्या मुद्दय़ावर आरा मशीनधारकांना नोटिसा बजाविल्यामुळे लाकूडकटाई थांबून हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जळण तुटवडय़ाचे मूळ प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून बंद केलेल्या लाकूडकटाईच्या आरा मशीनमध्ये (सॉ-मिल) दडले आहे. रामदास कदम यांच्या पर्यावरण विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबादच्या आरा मशीन नोटीस बजावून बंद केल्या आहेत. परिणामी लाकूडकटाई थांबली आहे. सोबतच आरा मशीनमधील कामगार आणि त्यावर आधारित लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यू भारत सॉ मिलचे मालक, औरंगाबाद टिंबर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अब्दुल रहेमान साहाब यांनी सांगितले की, औरंगाबाद शहर व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मिळून ५४ आरा मशीन बंद करण्यात आल्या आहेत. ज्या दिवशी बंद केल्याची कारवाई करण्यात आली, त्याच दिवशी आमच्या हातात नोटीसचा कागद ठेवण्यात आला. १४ डिसेंबरपासून ५४ आरा मशीन बंद आहेत. परवान्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली आहे. परवान्यासाठीची फाइल सर्वानीच पाठवली आहे. प्रशासनाकडून आधीच पूर्वकल्पना मिळाली असती तर आम्ही ही प्रक्रिया मशीन बंद करण्यापूर्वी केली असती. आरा मशीन बंद पडल्यामुळे औरंगाबाद शहर व चिकलठाणा परिसरातील १० हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ लाकूडकटाई करणारेच नाही तर लाकडांची वाहतूक करणारे रिक्षाचालक, सोफासेट आदी बनवणारे कामगार सध्या बसूनच आहेत. परवाना मिळाल्यानंतर प्रदूषण थांबेल, असा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा विचार असेल, असे रहेमान साहाब सांगतात.

गोपाल गजकेश्वर व शरद पंढरे सध्या अब्दुल रहेमान साहाब यांच्या कैलाशनगरातील न्यू भारत सॉ मिलमध्येच बुधवारी सावलीत बसून होते. दोघांचेही पोट सॉ मिलमधून लाकूड स्मशानभूमी किंवा फíनचरच्या व्यापाऱ्यांकडे लाकडांची वाहतूक करण्यातून मिळणाऱ्या पशांवर अवलंबून. तरुण गोपाल सांगत होता, दररोज किमान पाचशे रुपये मिळायचे. घर एकत्रित कुटुंब पद्धतीत असल्याने तितकीशी झळ अजून वाटत नाही; पण दिवसभराची कमाई ५०० रुपयांवरून ५० ते १०० रुपयांपर्यंतच आली आहे. पन्नास-शंभरही रुपये मोठय़ा मुश्किलीने जमतात. माझ्यापेक्षा शरद पंढरे यांचे अवघड आहे. बुधवारी दुपारी २ वाजले तरी त्यांची अद्याप कमाई नाही. शरद पंढरे सांगतात की, अनेक वर्षांपासून भारत सॉ मिलमधील लाकूड वाहतूक करण्याचे काम करतो आहे. रिक्षातून मिळणाऱ्या पैशांवरच सर्व कुटुंबकबिला चालवला जातो. महिन्याभरापासून कामाचे वांदे झाले आहेत. त्यामुळे घर कसे चालवायचे, असा प्रश्न सध्या आहे. लाकूडकटाईच्या अन्य एका बंद मिलमधील कामगार रफीक सांगत होते की, मी लाकूडकटाईचे काम करतो. माझ्या कामावरच कुऱ्हाड कोसळली आहे. महिनाभरापासून घरात बसून आहे. जेव्हा आरा मशीन सुरू होतील, तेव्हाच काम मिळेल. तोपर्यंत पर्याय नाही.

क्विंटलमागे लाकडाचे दर वाढले

बंद आरा मशीनमधून लाकूडकटाई थांबल्याने स्मशानभूमीत वापरले जात असलेल्या जळण लाकडाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. लाकडाच्या वखारीचे व्यापारी हाजी गुलाम मुस्तफा यांनी सांगितले की, एक महिना झाला लाकडाच्या दरात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गोल लाकूड सहाशे रुपये तर जळतणासाठी वापरण्यात येत असलेले फोडलेले लाकूड आठशे रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. लाकडांच्या वाढलेल्या दरामुळे स्मशानभूमीत लाकडांचा साठा मोजकाच ठेवल्याचे मसनजोगी सांगत आहेत.

First Published on January 12, 2018 1:21 am

Web Title: thousands of workers become jobless due to environmental department