पोलिसांकडून पुढाकार, सामाजिक कार्यासाठी गुपचूप सांस्कृतिक कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या देणगी मूल्य प्रवेशिका पोलिसांमार्फत वितरित केल्या जात आहेत. बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी येथे हा कार्यक्रम होणार आहे. हजारो रुपयांच्या या प्रवेशिका निवडक २०० व्यक्तींसाठीच मर्यादित आहेत. एवढय़ा कमी संख्येतील प्रेक्षकांसाठी पोलिसांमार्फत उभारल्या जाणाऱ्या निधीमुळे गृहखात्याच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पोलिसांनी तसेच आयोजकांनी कमालीची गोपनीयता राखली आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमातून जमा होणारा निधी कर्करुग्णांना तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांच्या मुलांना आर्थिक मदत म्हणून दिला जाणार असल्याचे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सामाजिक दायित्व निधीतून उद्योजकांनी कार्यक्रमाच्या प्रवेशिका घ्याव्यात, असा आग्रह पोलिसांकडून केला जात आहे.

महात्मा गांधी मिशनतर्फे (एमजीएम) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी कोणतेही तिकीट आकारण्यात आलेले नाही. उल्लेखनीय म्हणजे ‘एमजीएम’चे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कमलकिशोर कदम हे आहेत. कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना ‘भारतीय स्वातंत्र्य’ अशी असून कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मिथुन, गजेंद्र वर्मा, मोहम्मद इरफान, युविका चौधरी आदी कलाकार सहभागी होणार आहेत. मात्र, कलाकारांच्या उपस्थितीबाबत अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यावर अधिकृतरीत्या काही बोलण्यास पोलीस आयुक्तांनी नकार दर्शवला. दरम्यान, अमृता फडणवीस याही या कार्यक्रमात कलाकार म्हणून सहभागी आहेत. पोलिसांकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे पूर्वी नियोजन होत असे. मात्र, या कार्यक्रमासाठी काही निवडक व्यक्ती वा उद्योजकांनी सामाजिक कामासाठी मदत म्हणून देणगी प्रवेशिका स्वीकाराव्यात, असा आग्रह केला जात आहे. काही कंपन्यांनी यामध्ये दहा लाख रुपयांपर्यंतचा निधी दिला असल्याचा दावा पोलीस अधिकारी करीत आहेत.

कार्यक्रमाचे सर्व तपशील पोलीस आयुक्तांकडे उपलब्ध आहेत. आमच्या शैक्षणिक संस्थेतील रुक्मिणी सभागृह कार्यक्रमासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्थेचा एक अधिकारीही समन्वय साधून आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कलाकार असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्तचा तपशील माझ्याकडे नाही. प्रवेशिकेवर कोणतीही किंमत लिहिलेली नाही. मात्र, त्याचा हिशेब नीट ठेवला जाणार आहे. धनादेशाद्वारेच रक्कम स्वीकारली जाणार आहे. अंकुश कदम, एमजीएम संस्थेचे सचिव. 

१६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची प्रवेशिका.