फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी लेखक आहेत, त्यांचे लेखन मानवतावादाची साक्ष देत असल्यानेच मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली. धर्मद्वेषातून त्यांना ‘लक्ष्य’ करणे असहिष्णू वृत्तीचे लक्षण आहे, ही मराठी संस्कृती नव्हे, अशा शब्दांत मराठवाडय़ातील साहित्यिकांनी धमक्या देणाऱ्या प्रवृत्तींचा खडसावून निषेध व्यक्त केला असून राज्यभरातील साहित्यिक वर्तुळातूनही हाच सूर उमटायला सुरूवात झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची एकमताने केलेली निवड ही धर्मप्रचारक म्हणून नव्हे तर मराठी भाषिक लेखक म्हणून केली आहे, असेही साहित्यिकांनी स्पष्ट केले. मराठवाडय़ातील साहित्यिकांनी धमक्या देणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केला असल्याचे डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी सांगितले.

मराठी साहित्य समृद्धीत ख्रिस्ती लेखकांचे योगदान मोलाचेच राहिले आहे. थॉमस स्टीफन्स, जे. म्यूर, गटे, रेव्ह. ना. वा. टिळक यांच्यासह फ्रान्सिस दिब्रिटो यांचे लेखन मराठी साहित्याबरोबरच भारतीय साहित्यालाही गौरवास्पद आहे. त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्यविश्वाच्या कक्षा रुंदावल्या. मराठी भावविश्वात मराठी ख्रिस्ती साहित्य, मराठी मुस्लीम साहित्य आदी वाङ्मयीन प्रवाह समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने आणि सकस वाङ्मयाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे लेखकांनी म्हटले आहे.

के. एस. अतकरे, सुदाम मगर, प्राचार्य प्रभाकर बागले, बाळकृष्ण कवठेकर, प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. फ. मुं. शिंदे, बाबा भांड, डॉ. प्रल्हाद लुलेकर, जयदेव डोळे, दासू वैद्य, डॉ. इकबाल मिन्न्ो, जयराम खेडेकर, श्रीकांत उमरीकर, धनंजय चिंचोलीकर, डॉ. संजीवनी ताडेगावकर, डॉ. ललित अधाने, श्रीधर नांदेडकर, आसाराम लोमटे, श्रीकांत देशमुख, राहुल कोसंबी, रवी कोरडे, वीरा राठोड, रसिका देशमुख, पी. विठ्ठल, डॉ. बी. डी. जगत्पुरिया यांसह मराठवाडय़ातील अनेक साहित्यिकांनी धमक्या देणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केला आहे.

घडले काय?

* मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची एकमताने निवड झाल्यानंतर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या देणारे दूरध्वनी आले.

* दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असल्याने त्यांची निवड रद्द करण्याची मागणीही धमकावणाऱ्यांनी केली होती. या प्रकारानंतर मराठी साहित्यविश्वात तीव्र प्रतिक्रिया उमटली.

* मराठी साहित्यात दिब्रिटो यांचे नाव आदराने घेतले जाते. अशा व्यक्तीच्या निवडीवर धार्मिक दृष्टिकोनातून आक्षेप घेणाऱ्यांविरुद्ध सार्वत्रिक संताप व्यक्त होत आहे.

* साहित्यिक आता धमक्या देणाऱ्या धर्माध, असहिष्णू प्रवृत्तींच्या विरोधात उभे ठाकले आहेत.