फ्लेमिंगो आणि विविध बदकांचे पक्षी महोत्सवात निरीक्षण

पक्ष्यांचे अस्तित्व टिकावे म्हणून वन विभागाकडून तीन कोटी वृक्षलागवड केली जाणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पैठण येथे आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडेय, पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांची उपस्थिती होती.

जागतिक पातळीवर पक्षी मानवासाठी अविभाज्य असल्याचे मान्य झाले आहे. मात्र, आपल्याकडे पक्षी अभयारण्यासाठी विरोध होतो आहे. त्यांना पक्ष्यांचे महत्त्व पटवून सांगावे लागणार आहे. आम्ही जी स्वच्छता मोहीम राबवतो, ते काम गिधाडे करायची. आता त्यांची संख्या ४ कोटीवरुन ६० हजारांवर आली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. दरवर्षी असा पक्षी महोत्सव भरविण्याचा संकल्प विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्त केला. पैठण येथील पक्ष्यांचे हक्काचे अधिवास असणारे संत ज्ञानेश्वर उद्यान बकाल झाले आहे. ते वन विभागाकडे दिल्यास त्याचा चांगला विकास होईल, अशी सूचना या वेळी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चिमणी वाचविण्याची गरज असल्याचे सांगितले. महोत्सवासाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमास पक्षिमित्र दिलीप यार्दी, दिलीप भगत यांच्यासह एस. डी. भोसले, अण्णासाहेब शिंदे, विजय चाटुफळे, आबा बरकसे आदींची उपस्थिती होती. भाजपचे पदाधिकारी अधिक आणि पक्षी पाहण्यासाठी कमी लोक, असे चित्र उद्घाटनानंतर पक्षी निरीक्षणाच्या वेळी दिसून आले.

मानव विकासाची फेरमांडणी

मानव विकास मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या काही उपक्रमांची फेरमांडणी केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पूर्वी सर्व योजनांना निधी देताना काही चुका झाल्या आहेत. मात्र, या पुढे रोजगार निर्माण होतील, अशा योजनांची मांडणी केली जाणार आहे. मानवी निर्देशांक वाढावे यासाठी मोहफुलांपासून जेली, जाम बनविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. मराठवाडय़ातील कमी तालुके या योजनेमध्ये आहेत. मात्र, विदर्भातील अनेक तालुके या योजनेत असल्याने योजनांची फेरमांडणी करण्याच्या सूचना मानव विकास मिशनला दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची आर्थिक श्वेतपत्रिका आता पूर्ण झाली असून आघाडी सरकारने घेतलेल्या कर्जातून भांडवली खर्च करण्याऐवजी महसुली व्यवस्थापनावर खर्च केल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

पैठणच्या रस्त्याला वित्तमंत्रीही वैतागले

आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आज सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबाद ते पैठण असा गाडीने प्रवास केला. रस्ते आणि खड्डय़ांचे नाते किती दृढ आहे याचा अनुभव त्यांनी घेतला. गाडीत ते एका जागी बसूच शकले नाहीत. सतत मोठय़ा खड्डयातून गाडी काढताना त्यांचा वाहनचालक वैतागला होता. बसल्या जागी वित्तमंत्र्यांना डुलावे लागत होते. ते परतले आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना दूरध्वनी केला. ‘काहीही करा, पैशाची तरतूद नसेल ती लगेच करुन मिळेल, पण हा रस्ता नीट करा,’ अशा सूचना त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्तांनाही त्यांनी हा रस्ता कसा दुरुस्त करुन घेता येईल ते पाहा, असे सांगितले. रस्त्याची दुर्दशा आज मुनगंटीवारांनीही अनुभवली आणि ते वैतागले.