जिल्हय़ाच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब, आंबा, फळबागांसह रब्बीच्या काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले.
औसा तालुक्यातील मासुर्डी, बिरवली, शिवली, टाका, नांदुर्गा, पोमादेवी जवळगा, भादा परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वारा, पावसामुळे आंब्याचा मोहोर पूर्णत: गळून गेला. सलग चौथ्या वर्षी आंब्याचा मोहोर गळाला. शेतकऱ्यांनी मोठय़ा कष्टातून द्राक्षबागा टिकवल्या होत्या. वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागा कोलमडून पडल्या. तसेच पावसामुळे फळांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी काढणीला आलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले.
यलोली, भादा, नागरसोगा, गूळखेडा आदी गावांमध्ये भाजीपाल्यांची मोठी लागवड होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शिवली, बिरवली परिसरात वाऱ्याचा जोर प्रचंड होता. त्यामुळे विजेचे खांब कोलमडून पडले. गेल्या दोन दिवसांपासून वीज खंडित आहे. औसा तालुक्यातील बाणेगाव येथे हलक्या गारा पडल्या. या गारांमुळे पुढील वर्षी पाऊस पुन्हा लांबणार या भीतीने शेतकरी गलितगात्र झाला.
निलंगा तालुक्यातील हंद्राळ शिवारात दोन बल वीज पडून दगावले. राम नरसोबा शिंदे यांची लाखाची बलजोडी अवकाळीने हिरावून नेली. लातूर, चाकूर, उदगीर, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ या तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.