शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी अभाविपतर्फे आयोजित तिरंगा यात्रेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जागोजागी विविध संस्था, संघटनांसह नागरिकांनी पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत केले. भारतमाता की जय, वंदे मातरम् आदी घोषणा देत २२२२ फूट तिरंग्याने सरस्वती भुवन ते क्रांती चौक परिसर व्यापून गेला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतीक्षा करत शेकडो तरुण, तरुणी नागरिक सरस्वती भुवन मदानावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री येऊ शकणार नसल्याचे सांगितल्यानंतर अभाविप पदाधिकाऱ्यांनी यात्रा सुरू केली. तत्पूर्वी अभाविपचे हिमाचल प्रदेशातील महामंत्री आशिष चव्हाण, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, तंत्रशिक्षण संस्थेचे संचालक महेश शिवणकर, महानगर मंत्री तुषार साळुंके, प्रदेशाध्यक्ष मुंडे, स्वप्नील बेगडे, योगेश काळुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन यावेळी केले. प्रास्ताविक प्रा. योगिता पाटील तर सूत्रसंचालन भक्ती जोशी हिने केले. कार्यक्रमात १७ कि.मी. धावून हुतात्म्यांना अभिवादन केल्याबद्दल धावपटू सतीश अन्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निघालेली तिरंगा यात्रा देशभक्तीपर गीते, घोषणा, प्रत्येकाचा हात लांबलचक झेंडय़ास आधार देत मार्गक्रमण करत होती. औरंगपुरा, पठणगेट, नूतन कॉलनीमाग्रे क्रांती चौकातील झाशीची राणी स्मृतिस्थळी यात्रेचा समारोप झाला.