शौचालय बांधणीच्या जनजागृतीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पंचायतसमितीचे सभापती दत्तात्रय साळुंके यांनी अनोखा मार्ग अवलंबल्याचे दिसते. त्यांनी चक्क आपल्या कार्यलयात ‘शौचालय असेल तरच बोला’, अशी पाटी लावली आहे. त्यांच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हापरिषदेकडून शौचालय बांधण सक्तीचं करण्यात आलं आहे. मोहिमेच्या अंमलबजाणीसाठी कळंब पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय साळुंके यांनी त्यांच्या कार्यालयात नेमप्लेटच्या बाजूला शौचालय असेल तरच बोला’ अशी पाटी लावली आहे. दररोज शेकडो नागरिक पंचायत समितीमध्ये येतात. या शौचालय पाटीवर नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या याबाबत साळुंके यांना विचारलं असता, महिनाभरापासून विविध माध्यमातून आम्ही शौचालय बांधकामाबाबत जन-जागृती मोहीम राबवत आहोत. मोहिमेला साथ देत आतापर्यंत ६० टक्के नागरिकांनी आपल्या घरी स्वच्छतागृह बांधली आहेत. उर्वरित नागरिकांना आम्ही महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

जो कोणी स्वच्छतागृह बांधणार नाही. त्यांना तहसीलदार यांच्याकडून रेशनबंदचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे अगोदर नागरिकांना त्याबाबत कल्पना होती. लोकांना जास्त बोलून चालत नाही. मात्र स्वच्छतागृहाचा प्रश्न जनतेच्या हिताचा आहे. त्याच्या बांधकामात आणखी वाढ व्हावी, म्हणून आपण ती पाटी लावली असल्याचं ते म्हणाले. पुढील पंधरा दिवसात तालुका हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.