स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जि.प. स्वच्छता विभागाकडून अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पूर्ण कुटुंब शौचालय वापरात असल्यास हिरवे कार्ड ‘लय भारी’, नसलेल्या ठिकाणी लाल ‘खतरा’, असूनही बाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या घरावर भगव्या रंगाचे ‘जरा जपून’, तर फक्त महिला वापरत असेल आणि पुरुष बाहेर जात असल्यास पिवळे ‘फिफ्टी फिफ्टी’ कार्ड लावण्यात येत असून शौचालयांची स्थिती दर्शविणाऱ्या कार्डावरून १०५ गावातील घरांची ‘प्रतिष्ठा’ ठरणार आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात या वर्षी १०५ ग्रामपंचायतींची संपूर्ण हागणदारी मुक्तीसाठी निवड करण्यात आली. आतापर्यंत १० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. गतवर्षी १२ हजार ७०० शौचालये बांधण्यात आली. पकी १० व या वर्षीच्या १० अशा २० ग्रामपंचायतींच्या हागणदारीमुक्त उपक्रमाची पथकाकडून ३१ डिसेंबरपूर्वी पडताळणी होणार आहे. जि.प. स्वच्छता विभागाकडून यंदा संपूर्ण हागणदारीमुक्त गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या योजनेची जनजागृती व्हावी, या उद्देशाने माहिती संवाद आणि शिक्षण, लाभार्थी कुटुंबाचा मागणी अर्ज, आकाशवाणीवरील ‘बोला काय म्हणता’ असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. निवड झालेल्या गावांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे व इतर अधिकारी स्वत: दौरा करून गावफेरीच्या माध्यमातून थेट ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. लोकांमध्ये या योजनेविषयी उत्सुकता वाढावी, या उद्देशाने चार प्रकारचे कार्ड तयार करण्यात आले आहेत. यात हागणदारीमुक्तीसाठी निवड करण्यात आलेल्या गावांमधील शौचालय वापरणाऱ्या कुटुंबाच्या घरांवर ‘लय भारी’ उल्लेख असलेले हिरवे कार्ड, ज्यांच्याकडे नाहीत अशा घरांच्या दारावर ‘खतरा’ लाल रंगाचे, असूनही वापरात नसलेले ‘जरा जपून’ भगव्या रंगाचे, तर फक्त महिलाच वापरत असतील आणि पुरुष बाहेर जात असल्यास पिवळ्या रंगाचे ‘फिफ्टी फिफ्टी’ कार्ड चिटकवण्यात येत आहेत.
पहिल्या टप्प्यात २० हजार कुटुंबांच्या घरावर शौचालयाची स्थिती दर्शविणारे कार्ड चिटकवण्यात आले आहेत. जिल्ह्यात निवड झालेल्या गावांमध्ये ३३ हजार ४०७ शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १२ हजार ९०० बांधकाम पूर्ण झाले. योजनेत जिल्हा राज्यात दहाव्या क्रमांकावर आहे.
ग्रामस्थांना बांधले फेटे
संपूर्ण हागणदारी मुक्त गावासाठी प्रशासन कामाला लागले असून अधिकाऱ्यांनी स्वत: प्रत्येक गावांमध्ये भेटी देऊन जनजागृती केली आहे. गावांमध्ये शौचालय बांधलेल्या ग्रामस्थांना अधिकाऱ्यांनी फेटे बांधून सर्वासमोर त्यांचे कौतुक करत उत्साह वाढवला. या उपक्रमामुळे इतरांनाही शौचालय बांधण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेच्या जनजागृती प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. ज्यांच्या घरात शौचालय नाही, अशा विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र पाठवून शौचालय बांधण्याची विनंती केली, तर ज्यांच्या घरी शौचालय आहे अशा विद्यार्थ्यांनी पालकांना धन्यवाद दिले. या उपक्रमास ‘मिशन पोस्टकार्ड’ असे नाव दिल्याचे स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सांगितले.